राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच दौंड शहरात येत्या ५ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉन मध्ये लहान, युवक ते ज्येष्ठ नागरिक असे दोन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. अशी माहिती डॉक्टर रोहन खवटे यांनी दिली.
खवटे एक्सीडेंट हॉस्पिटल, स्वर्गीय भाऊसाहेब भागवत विद्यालय दौंड, आणि रोटरी क्लब (दौंड, कुरकुंभ (एमआयडीसी) व पाटस ) यांच्या संयुक्त विद्यमानाने दौंड शहरात रविवारी ५ फेब्रुवारीला भव्य आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे.
मंगेश मेमोरियल स्कूल बोरावके नगर चौक ते कुरकुंभ मोरी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोस्ट ऑफिस पर्यंत धावणार आहे. पुन्हा पोस्ट ऑफिस ते त्याच मार्गाने मंगेश स्कूल या ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. १० किलोमीटर अंतरावरील ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत १२ वर्षाखालील तसेच १८ ते ४५ वयोगट व ४५ च्या पुढील वयोगटातील ज्येष्ठ नागरिक ही सहभागी होऊन या स्पर्धेत धावणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला जीपीएस सेन्सर लावण्यात येणार आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या कोणत्याही स्पर्धकावर अन्याय होणार नाही याची दक्षता आयोजकांकडून घेण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेसाठी तीन लाखांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असल्याने दौंड शहरासह पुणे इतर जिल्ह्यातील व राज्यातील तब्बल दोन हजार स्पर्धकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे ही मॅरेथॉन स्पर्धा वेळेत सुरू होणार आहे. नियमित व्यायामाची सवय लागावी, आरोग्य विषयी जनजागृती निर्माण व्हावी, व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, लहान असो किंवा ज्येष्ठ यांच्या आरोग्याचा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आम्ही मागील तीन वर्षापासून अशी स्पर्धा भरवत आहोत.
मात्र यंदाच्या २०२३ ची ही स्पर्धा राष्ट्रीय दर्जाची होणार आहे. तशी तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेतून भविष्यात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेक ही तयार होऊ शकतो. असा विश्वास डॉ.खवटे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान या स्पर्धेसाठी आयपीएस दर्जाचे अधिकारी विनिता शाहू, वसंतराव परदेशी , सातारा हिल मॅरेथॉनचे मुख्य आयोजक डॉ. संदीप काटे, डॉ. विनिता आपटे, अमृता पंडित (पानसे) उपस्थित राहणार आहेत.
दौंड शहर तालुक्यातील राजकीय सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी, अधिकारी व मान्यवर ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती डॉ. खवटे, दौंड रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश दाते, कुरकुंभ एमआयडीसी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील ठोंबरे, पाटस रोटरी क्लबचे अध्यक्ष विश्वास अवचट, दौंड तालुका क्रीडा संघटनेच्या अध्यक्ष जे एन आवारे, दिनेश भागवत, नितीश पोखार यांनी दिली.