महान्यूज लाईव्ह विशेष
विक्रम शिवाजीराव जगताप आणि घनश्याम केळकर
जात हे आपल्या समाजाचे वास्तव आहे. जी कधीच जात नाही ती जात असे म्हणतात. मुळातच राजकारणाचा खेळ मोठा निष्ठूर असतो, त्यामध्ये तेव्हा जातीचा रंग मिसळतो त्यावेळी तर सगळ्यांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडून टाकतो. ऐकेकाळच्या पणदऱ्यात हे असेच घडत होते. कोकरे हे धनगर आणि जगताप हे मराठा. हे दोन्ही समाज एकमेकाविरोधात उभे ठाकत होते. त्यांच्यातील संघर्ष वेळोवेळी हिंसक रुप घेत होता. यामुळे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून पणदरे गाव अतीसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. पण आजच्या पणदऱ्याच्या राजकारणात तो विखार राहिलेला नाही. आजच्या राजकारणात जात फॅक्टर नाही असे कुणीच म्हणणार नाही, पण ती पुर्वीची टोकाची व्देषभावना मात्र संपलेली आहे. आज इथे राजकारणासाठी राजकारण होते. इथल्या प्रत्येक राजकीय गटामध्ये कोकरे आणि जगताप सगळ्या छोट्या मोठ्या जातसमूहांसह एकत्रित दिसतात. आजच्या या पणदऱ्याच्या राजकारणाचा नवा पॅटर्न ज्यांनी मोठ्या संयमाने रुजविला त्या प्रमुख मंडळींपैकी एक नाव म्हणजे तानाजीकाका कोकरे.
तानाजीकाकांची सगळी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द जर एकाच शब्दात मांडायची असेल तर योग्य शब्द आहे समन्वय. कधीही अतिरेकी भुमिका न घेता, संघर्षाच्या मार्गाने न जाता दोन्ही बाजूंना समजावून घेऊन मार्गक्रमण करणे हा तानाजीकाकांचा स्वभाव राहिला आहे. पण नियतीचा खेळ बघा, अशा स्वभावाच्या या माणसाची अगदी उमेदीची दोन वर्षे तुरुंगात गेलेली आहेत. तानाजीकाकांची कौटुंबिक पार्श्वभुमी ही राजकीय आणि समाजकारणाचीच राहिली आहे. त्यांचे आजोबा खंडेरावआण्णा हे पणदरे ग्रामपंचायतीचे दुसरे सरपंच होते. त्यावेळचे पणदरे गाव म्हणजे आजच्या ८ ग्रामपंचायती एकत्रित असलेले होते. त्या काळातही खंडेरावआण्णा हे प्रगतीशील विचारांचे होते. आपल्या सगळ्या मुलांनी उच्चशिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आपल्या एका मुलाला शिक्षणासाठी त्यांनी परदेशातही पाठवले होते. घरात लग्नकार्य झाल्यावर बकऱ्या कापण्याची त्या काळातील प्रथा होती. पण लग्नासारख्या शुभकार्यात पशुहत्या नको या विचाराने त्यांनी आपल्या परिवारात ही प्रथा बंद करायला लावली होती.
त्यांचे वडील टी के बापू कोकरे हे लोकल बोर्डाचे सदस्य होते. त्यावेळचा त्यांचा लोकल बोर्डाचा मतदारसंघ हा पणदरे ते निंबूत असा पसरलेला होता. पणदऱ्याचे टी के बापू हे आजही एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या आठवणीत आहेत. काकांचे वडील टी. के. बापू काेकरे हे हुकमी पद्धतीने राजकारणाचे डाव-पेच खेळत. त्यांची संपुर्ण कारकीर्द ही एखादा राजकीय सिनेमाला शाेभेल अशीच हाेती. नव्वदच्या दशकात टी. के. काेकरे या नावाची गाव-परिसरात चांगलीच दहशत हाेती. एखादा निर्णय स्वतःच्या मनाला पटला तर ताे काेणाला ताे आवडाे किंवा न आवडाे ताे थेटपणे घेत असत. मात्र एक निर्णय आपल्या हातून चुकला आहे हे कळल्यानंतर स्वतःची चूक कबूल करत ताे त्यांनी माघारही घेतल्याची आठवण गावकरी सांगतात. त्याचा किस्सा असा, नव महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक महादेव जिजाबा जगताप हे पंचक्रोशीतील गाेरगरिबांच्या मुलांनी शिकावे, शिकून माेठे व्हावे या तळमळीने शाळेकरिता अहोरात्र झटत. टी. के. बापू काेकरेंच्या आजूबाजूच्या काेंडाळ्यातील काही समाजकंटकांनी कान भरले आणि शाळेच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडण्याचा निर्णय टी. के. बापूंनी घेतला हाेता परंतू महादेव तात्यांच्या नावाची आदरयुक्त भीती गावात हाेती. शाळेचे पाण्याचे कनेक्शन तोडण्याचा आपला निर्णय चुकला आहे आणि स्वतःच्या हातून चूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी महादेव तात्यांची माफी मागितली आणि नव महाराष्ट्र विद्यालयाचे पाणी कनेक्शन पूर्ववत केले.
राजकारणाचा खेळ मोठ्या कुशल पद्धतीने खेळावा लागतो. पणदऱ्यावर टी के बापूंनी त्यांच्या काळात जवळपास दहा ते पंधरा वर्षे एकहाती वर्चस्व ठेवले. पण त्यांच्या राजकीय कुशलतेचा एक किस्सा आजही पणदऱ्यात चर्चेत असतो. त्याचे असे झाले की, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी पणदऱ्यातील एका कुटुंबातील एका तरुण मुलाने मोठ्या उत्साहाने चौकात फटाके फोडले. अर्थातच गावात वातावरण तंग झाले. हे घर सगळ्यांच्या डोळ्यावर आले. पणदऱ्याचा उसळणारा स्वभाव टी के बापूंना चांगलाच परिचयाचा होता. या घरावर हल्ला होणार असल्याची बातमीही त्यांना मिळाली. त्यांनी आपल्याच काही कार्यकर्त्यांना या घरावर दगडफेक करायला लावली. या घराच्या काचा, खिडक्या फोडल्या. त्यानंतर ते स्वत:च शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले. आपल्या या खेळीने त्यांनी या घराला मोठ्या आपत्तीतून वाचवलेच पण त्याचबरोबर गावातील आपल्या राजकीय विरोधकांच्या भात्यातील बाण सुटण्यापूर्वीच निकामी केला. पणदरे परिसरातील कौताकनगर हे त्यांनी वसवले आहे. ही गायरान जमीन होती. पण टी के बापूंनी स्वत: पुढाकार घेऊन तिथे लोकांना जागा दिल्या. आज त्या ठिकाणी २०० च्या पुढे घरे वसलेली आहेत. या सर्वांना कायमचा निवारा झाला आहे.
अशा घराचा वारसा असलेले तानाजीकाका अर्थातच त्यांच्या अगदी तरुण वयातच राजकीय आणि सामाजिक जीवनात हिरीरीने उतरू लागले. गावातील आणि तालुक्यातील पुढाऱ्यांचेही त्यांच्याकडे एक उभरते नेतृत्व म्हणून लक्ष जावू लागले. त्यावेळी पणदऱ्यात सूतगिरणी काढण्याचे काम आप्पासाहेब पवारांनी मनावर घेतले होते. त्यासाठी जमिनी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यामध्येही त्यांनी तानाजीकाकांची मदत घेतली. तानाजीकाकाही उत्साहाने त्यांच्यासोबत काम करू लागले. त्यावेळी गावात त्यांनी तरुणांचे संघटन उभारले. यंग स्टार क्लब नावाने तरुणांचे संघटन उभारले. . पणदऱ्याच्या जुन्या एसटी स्टॅन्डजवळ गीताबाई रहात होती. ती फारशी बोलत नसे. कुणाकडून काही घेत नसे. तिला एखादा प्रश्न विचारला तर हो किंवा नाही असे सांगत असे. पण हळूहळू लोकांच्या असे लक्षात येऊ लागले की ती जे बोलते ते खरे होते. मग लोग कोणत्याही महत्वाच्या कामाला निघाले तर पहिल्यांदा गीताबाईला विचारू लागले. यातून एक आध्यात्मिक ताकद असलेली व्यक्ती म्हणून गीताबाई पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली. तिची सगळी काळजी कोकरे कुटुंबिय घेत असत. गीताबाई मृत्यू पावली तोपर्यंत तिला पणदऱ्यात संतत्वाचा दर्जा प्राप्त झाला होता. तानाजीकाकांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गीताबाईचे मंदीर उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले. अर्थात हे मंदीर उभारण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होताच. त्यासाठी काकांनी एक वेगळाच मार्ग शोधला. त्यावेळी गावागावात जाऊन चित्रपट दाखविणारे लोक होते. ते चित्रपट दाखविण्याचे मशिन घेऊन येत असत. काकांनी पुण्याच्या अशाच पुरंदरे बंधूंशी संपर्क साधला. हे पुंरदरे मोटारसायकलवर चित्रपटाचे मशीन आणि रिळे घेऊन पणदऱ्यात येत असत. येथे १ रुपया तिकीटावर चित्रपट दाखवला जाई. यातून जमा होणाऱ्या पैशातून गीताबाईच्या मंदिरासाठी निधी जमा करण्यास सुरुवात झाली. हे चित्रपट पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत असे. एक गाव बारा भानगडी हा चित्रपट त्यावेळी तीन दिवस चालला होता. पण असे चित्रपट दाखवणे हे कायद्याच्या कक्षेत बसत नाही हे यातील कुणाच्याच गावी नव्हते. यातून ऐके दिवशी तहसीलदाराने या ठिकाणी छापा मारून सगळी सामग्री जप्त केली. मात्र यावेळेस झालेल्या गोंधळात तहसीलदाराला धक्काबुक्कीही झाली. अर्थातच वातावरण चांगलेच पेटले. यातून चित्रपटांचे हे खेळ बंद पडले. अर्थातच गीताबाईच्या मंदिराचेही काम बंद झाले. ते नंतर लोकवर्णतीनून पुर्ण करण्यात आले. पण या सगळ्यातून तानाजीकाकांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. हा तरुण पणदऱ्याचे भावी नेतृत्व ठरणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली. पण याचवेळी असा एक हादरा बसला की त्यांचे केवळ राजकीय, सामाजिकच नव्हे तर कौंटुबिक जीवनही अस्थिर झाले.
भावकीमध्ये झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा मृत्यू ओढवला. या व्यक्तीच्या खूनाच्या आरोपाखाली काकांसह चार पाच जणांना जवळपास दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. काकांच्या उभरत्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला खीळ घालण्याचा राजकारणी डावही यामागे होताच. आता या तरुण मुलाचे भवितव्य अंधारात जाण्याची खात्री पटून विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. पण संयम आणि समन्वय या मार्गाने वाटचाल करत तानाजीकाकांनी आपली सामाजिक आणि राजकीय कारकिर्द पुन्हा उभारली. अर्थात या गु्न्ह्याच्या आरोपातून त्यांची पुढे निर्दोष सुटकाही झाली. दरम्यानच्या काळात मनःशांती साठी आपण गीतेचे वाचन केल्याचे तानाजी काका सांगतात. आज ज्यांना जुना इतिहास माहिती नाही त्यांना तानाजीकाकांना ऐकेकाळी काही वर्षे तुरुंगातही काढावी लागली होती हे सांगूनही खरे वाटणार नाही.
तानाजीकाका बारामतीच्या परिसरात लोकांच्या परिचयाचे आहेत ते माळेगाव कारखान्याचे संचालक आणि माजी व्हाईस चेअरमन म्हणून. १९९७ पासून आजपर्यंत ते सलगपणे या कारखान्याच्या वाटचालीत त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. माळेगाव कारखान्याच्या सत्तासंघर्षात नेहमी दोन गट राहिलेले आहे. एक गट चंद्ररावआण्णा तावरे यांचा आणि दुसरा गट अजितदादा पवारांचा. तानाजीकाकांनी दोन्ही गटांसोबत काम केले आहे आणि ते दोन्ही गटांच्या प्रमुखांचे विश्वासू राहिलेले आहेत. त्यांच्या पहिल्या संचालकपदावेळीही हे दोन्ही गट त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नात होते. पण ते अखेर चंद्ररावआण्णांकडून संचालक झाले. पण निवडणुकीचा किस्साही मोठा गंमतशीर आहे.
खरे तर या निवडणुकीत तानाजीकाकांनी स्वत: फॉर्म भरलाच नव्हता. त्यांचा फॉर्म त्यांच्या वतीने भरला त्यांचे वडील बंधू शिवाजी कोकरे यांनी. त्यावेळी तो फॉर्म स्वतंत्र म्हणून भरलेला होता, कोणत्याही गटाकडून भरलेला नव्हता. निवडणूकीची धामधूम सुरु झाली त्यावेळी तानाजीकाका पंढरपूरच्या वारीत होते. चंद्ररावआण्णांच्या गटाने त्यांना वारीतच गाठले आणि तेथून त्यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे घेऊन गेले. फॉर्म परत घेण्याची मुदत संपेपर्यंत त्यांना तिथेच वेगवेगळी कारणे सांगून गुंतवून ठेवले. इकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तानाजीकाकांनी चंद्ररावआण्णांच्या गटाकडूनच फॉर्म भरलेला आहे असे सांगितले गेले. त्यावेळी या निवडणुकांचे नियमही आजच्याऐवढे कडक नव्हते. तानाजीकाका परत आले त्यावेळी फार्म भरण्याची मुदत संपून गेली होती. आता त्यांच्यापुढे चंद्ररावआण्णांच्या गटाकडून निवडणूक लढविण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता. अर्थात काकांचे आणि चंद्ररावआण्णांचेही संबंध तेव्हा आणि आजही सलोख्याचेच राहिलेले आहेत. त्यामुळे काकांनी परिस्थितीचा स्विकार केला. अशा रितीने पहिल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत ते चंद्ररावआण्णांकडून संचालक राहिले. दुसऱ्या निवडणूकीच्या वेळी चंद्ररावआण्णा आणि अजितदादांच्या गटात समझोता झाला. यानूसार पहिले अडीच वर्षे चंद्ररावआण्णा चेअरमन व उर्वरीत अडीच वर्षे अजितदादांच्या गटाचा चेअरमन असणार होता. या उर्वरीत अडीच वर्षात काकांना चंद्ररावआण्णांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. अजितदादांच्या गटाचे बाळासाहेबभाऊ तावरे यांच्या चेअरमनशीपखाली त्यांनी काम सुरु केले. इथेही त्यांचा समन्वयाचा गुण उपयोगाला आला. दोन्ही गटांना न दुखवता कुशलतेने ते प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत राहिले. मात्र इथे त्यांचे आणि बाळासाहेब भाऊंचे सूर जुळले आणि त्यानंतरची त्यांची सगळी राजकीय कारकिर्द ही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालीच घडली. माळेगाव कारखान्यात ते बाळासाहेबभाऊच्या नेतृत्वासोबत काम करत राहिले.
माळेगाव कारखान्याच्या सगळ्या सभासदांचा अपघाती विमा काढण्यासाठीचा आग्रह तानाजीकाकांचा होता. ताे त्यांनी आपल्या पहिल्या संचालकपदाच्या कारकिर्दीत पुर्ण केला. याच काळात पहिला चार आकडी भाव ऊसउत्पादकाला मिळाला. इथुन पुढे सहकारी साखर कारखान्यांमध्ये बाजारभावाची स्पर्धा सुरु झाली आणि आज हा भाव प्रतीटन ३००० च्या पुढे जाऊन पोचला आहे. सहकारी साखर कारखानदारीच्या या प्रत्येक टप्प्यावर तानाजीकाकांचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे.
पणदऱ्याच्या राजकारणातील जातीय वाद तानाजीकाकांना सतत अस्वस्थ करत राहिला होता. या जातीय वादाने पणदऱ्याचे नाव खराब होत होते. यातून काहीतरी तोडगा काढण्याची त्यांनी मनापासूनची तळमळ होती. शंकर रेडे, अशोक बनकर, एस एन बापू जगताप यांच्यासोबत नेहमी पणदऱ्यातील हा संघर्ष संपवण्याबाबत नेहमी चर्चा होत असे. पण तरीदेखील यासाठी पाचसहा वर्ष गेली. गावात त्यांच्या विचाराचे इतरही लोक होते. त्यात एस एन बापू जगताप आणि भगतआबा जगताप हेदेखील याच मताचे होते. यातून पणदरे ग्रामपंचायतीची एक निवडणूक बिनविरोध करण्यात त्यांना यश आले. यासाठी झालेल्या दोन्ही बैठकीत अल्पसंख्याक समाजातील रमेश दोशी यांना सरपंच करा अन्यथा मी सरंपदाचा फॉर्म भरतो असे ट्रम्पकार्ड तानाजीकाकांनी खेळले. भरपूर चर्चेनंतर रमेश दोशी सरपंच आणि कोकरे आणि जगताप गटाकडून प्रत्येकी ७ जण ग्रामपंचायत सदस्य होतील असे ठरले. या बिनविरोध निवडणूकीपासून गाव शांत झाले. गावातील दाेन्हीही विराेधी गट सामंजस्य दाखवत एकत्र आल्याने याच काळात गावात सर्वाधिक विकासकामे झाली. यामध्ये पणदरे गावची प्रशस्त ग्रामपंचायत इमारत, ग्रामसचिवालय, तलाठी कार्यालयाची इमारत याबरोबरच ग्रामपंचायतच्या मालकीची गायरानची जागा देऊन आज आहे त्या ठिकाणी माेठे एस टी स्टॅन्ड उभारले जावे याकरिताही तानाजी काकांनी पवार साहेबांकडे आग्रही भूमिका मांडली. गावात माेरगाव-फलटण व निरा-बारामती अशा चारही दिशांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या चाैकात एस टी स्टँड झाल्याने पंचक्रोशीतील अनेकांना ते सायीचे झाले. एस. टी. स्टॅन्डच्या परिसरात ५० गाळ्यांची निर्मितीही याच काळात करण्यात आली. गावातील दाेन्हीही राजकीय गटांनी निवडणूक बिनविरोध करत सामंजस्याने एकत्र आल्यानेच एव्हढ्या माेठ्या प्रमाणात विकासकामे हाेऊ शकल्याचे तानाजी काका सांगतात.
पणदऱ्याला सहकाराचा वारसा आहे. तोच वारसा तानाजीकाकांनीही चालवला. पणदऱ्यात सुरु झालेल्या पहिल्या चार सोसायट्यांमध्ये त्यांची विकास सोसायटी आहे. ही सोसायटी त्यांच्या आजोबांनी म्हणजे खंडेरावआण्णांनी पणदरे नं. ३ या नावाने १९३६ मध्ये सुरु केली होती. यापूर्वीच्या नं. १ आणि नं. २ या दोन्ही सोसायटया आता नाहीत. पण पणदरे नं. ३ ही सोसायटी खंडेरावआण्णांच्या नावाने अजूनही तानाजीकाकांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे. सहकारामध्ये एका साखर कारखान्याभोवती विकास सोसायट्या, पतसंस्था, दुधसंस्था असे जाळे तयार होते. हे सगळे एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे माणसे जोडली जातात आणि एकत्रित राहतात. तानाजीकाकांनी सुरु केलेली पतसंस्थाही उत्तम काम करते आहे. ज्याकडे पत नाही त्याला विश्वास देऊन आर्थिक आधार देण्याचे काम पतसंस्था चांगल्या रितीने करू शकते. तानाजीकाकांच्या या पतसंस्थेनेही अशा अनेक पत नसलेल्या कुटुंबांना उभे केले आहे. आज याच कुटुंबांच्या ठेवी या पतसंस्थेचा मोठा आधार आहे. आज या पतसंस्थेत साडेचार कोटींच्या ठेवी असून साडेतीन कोटींचे कर्जवाटप केलेले आहे. या पतसंस्थेत आज १४ जण काम करतात. पण या आधारावर आपले संसार उभे करणारांची संख्या शेकडोमध्ये आहे. तानाजीकाकांनी एक सहकारी दुधसंस्थाही काढली होती. तीदेखील चांगली चालली होती. पण राजकारणाचा खेळात या दुधसंस्थेला तोटा होऊन दुधउत्पादकांचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे काकांनी ही संस्था स्वत:हूनच बंद करण्याचा निर्णय घेतला.
गावकी आणि भावकीच्या खेळात अनेकदा गावातील कमी लोकसंख्या असलेल्या समाजाकडे दुर्लक्ष होते. त्यांना कोणी वालीच रहात नाही. ज्यावेळी वनखाते नव्याने सुरु झाले त्यावेळी डोंगररानातील चराऊ कुरणांवर आपला हक्क प्रस्थापित केला. त्यावेळी या चराऊ कुरणांच्या आधारे शेळी,मेंढ्या पाळून जीवन जगणाऱ्या समाजापुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिला. त्यांना इतर व्यवसायांकडे वळावे लागले. पण गावातील विकास सोसायट्या आणि बॅंका त्यांना आर्थिक मदत देण्यास तयार नव्हत्या. यावेळी तानाजीकाकांनी स्वत: पुढाकार घेऊन या समाजाच्या लोकांना एकत्र करून एक नवीन विकास सोसायटी स्थापन केली. ती त्यांच्याच ताब्यात दिली. त्यातून या समाजातील लोकांचा अर्थपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला.
जी गोष्ट होणार नाही असे लोक म्हणतात, अशा क्लिष्ट विषयांना हात घालण्याची तानाजीकाकांना मोठी हौस आहे. पणदरे परिसरातील गायकवाड मळ्याच्या रस्त्याचा प्रश्न जवळपास ६० वर्षे भिजत पडला होता. लोकांना चिखल तुडवत यावे लागत होते. हा न होणारा रस्ता तानाजी काकांनी स्वत: लक्ष देऊन करुन घेतला. मधल्या शेतकऱ्यांची समजून घातली, त्यांना या रस्त्याचे महत्व समजावून सांगितले. तिथे मध्ये भिंत घालून घेतली, त्यामुळे पुढच्या काळात रस्ता रुंद होऊन आपल्या जमिनी जातील ही भिती संपवली. वहिवाटीची शेतजमीन घेतली नाही. फक्त बांधच रस्त्यात घेऊन हा रस्ता करून घेतला. समन्वय साधण्याचा गुणच तिथे उपयोगी पडला.
तसे पाहिले तर कारखान्याच्या संचालकपदाखेरीज काकांनी कुठलेही पद घेतले नाही. पण पणदरे परिसरात त्यांची कायम निर्णायक भुमिका राहिली. अनेकांच्या आजारपणात ते रात्री अपरात्री धावून गेले आहेत. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. पणदरे येथील तलाठी कार्यालय लाेकवर्गनीतून बांधण्यात आले असून ते रमेश दाेशी सरपंच असतानाच्या कार्यकाळात हाेऊ शकले. म्हणजेच थाेडक्यात भावकी-गावकीचे वाद आणि राजकीय मतभेद दूर सारून गावातील दाेन्हीही गटाच्या नेतेमंडळींनी समंजस भूमिका घेऊन एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली त्या काळातच गावात अनेक विकासकामे झाली अशी एक विशेष आठवण तानाजी काकांनी सांगितली. आजच्या पिढीतील राजकारणात सक्रिय असणाऱ्या तरूण नेतेमंडळींनी यातून याेग्य ताे बाेध घेण्याची गरज असल्याचेच त्यांना यातून सुचवायचे आहे. यामध्ये स्टँडवरील गाळे, तलाठी कार्यालय, ग्रामसचिवालयाची ४ मजली प्रशस्त इमारत, स्मशानभूमीला कंपाऊंड इ. अनेक कामांचा त्यात समावेश आहे. स्टँडकरिता एसटीला गायरानची जागा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यातही तानाजी काकांची आग्रही भूमिका हाेती.राजकारणाबराेबरच घरच्या शेती व शेतीपूरक पशूपालनाच्या व्यवसायातही ते जातीने लक्ष घालतात.काकांच्या गाेठ्यात २५ ते ३० जनावरे असून ८ जणांना राेजगार उपलब्ध झाला आहे. तानाजी काकांनी आजारी लाेकांना रात्री बेरात्री सहकार्य केले असून गरजू हाेतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे.
खंडेरावअण्णांनी सासुरवाडीतील दहिवडीतील उंबर मळद येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभ झाल्यानंतर घरी बकरी कापण्याची अनिष्ट प्रथा स्वतःहून पुढाकार घेऊन बंद पाडली. कारण सुखाच्या क्षणी पशू बळी नकाे. राजकारण-समाजकारणातील एकेकाळचे बडे प्रस्थ असलेल्या खंडेरावआण्णा काेकरे यांचा वारसा तितक्याच ताकदीने व समर्थपणे चालवण्याचा प्रयत्न तानाजीकाका करताना दिसतात. या कामी त्यांच्या मदतीला धावून येतात ते त्यांनी जाेडलेली शेकडो विश्वासू माणसे व त्यांचा शांत, संयमी व मध्यम मार्गाचा अवलंब करत काेणालाही न दुखावता समन्वय साधण्याचा स्वभाव गुण.
( या सदरात आपला लेख प्रसिद्ध करण्यासाठी कृपया ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा )