अभेपुरीचा ट्रॅक्टर चालक संदीप साबळेने एका ट्रीप मध्ये तब्बल ४७ .४५१ टन इतकी विक्रमी ऊसाची वाहतूक केली.
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की, चर्चा होते, ती ऊस वाहतुकीची! साधारणतः ट्रॅक्टरचालक वीस ते पंचवीस टनापर्यंत उसाची वाहतूक करतात, मात्र गुरुवारी एका ट्रॅक्टर मधून चक्क ४७.४१५ टन एवढ्या वजनाचा ऊस वाहून आणला.
कारखान्यामध्ये ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः २२ ते २५ मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु आज (गुरुवारी) अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने ४७.४५१ मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला.
कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी अक्षय पवार व वाहनचालक संदिप दिलीप साबळे यांचा शॉल, श्रीफळ, पेढे देऊन यथोचित सत्कार केला.
किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यांचा गाळप हंगाम मोठ्या उत्साहात सुरू केला.
किसन वीर व खंडाळा कारखाना सुरू झाल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे. किसन वीर व खंडाळा कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद हतबल झाला होता. पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच मे २०२२ मध्ये कारखान्याच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याची सुत्रे आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्याकडे आली.
शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासावर किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने वेळेत सुरू करून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिला अॅडव्हान्स जमाही झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येऊ लागला. कारखान्याचे गाळपही व्यवस्थितपणे सुरू आहे.
२ फेब्रुवारी रोजी सुरज रामदास येवले पांडेवाडी, (ता. वाई) या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस अक्षय कृष्णदेव पवार यांच्या वाहनातून आणण्यात आला. या वाहनाचे भर वजन ५६.१८० मेट्रिक टन असून निव्वळ ऊसाचे वजन ४७.४५१ मेट्रिक टन भरल्याने काट्यावर वजनच करता आले नाही व काटा लॉक झाला. किसन वीर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन भरून आल्याने या वाहन मालकाचा सत्कार कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केला.
अक्षय पवार यांच्या सत्कारप्रसंगी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, खंडाळा कारखाना शेती अधिकारी अशोक घाडगे, केनयार्ड सुपरवायझर हणमंत निकम, अरविंद नवले, संदीपशेठ बाबर, अजय भोसले, विजय शिंगटे, सुजितसिंह जाधवराव, सचिन निकम, मामा पाटील, गिरीश कडाळे, ज्ञानेश्वर महामुनी आदी उपस्थित होते.