लातूर – महान्यूज लाईव्ह
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेचा घोटाळा सध्या राज्यात गाजतोय. मात्र कालपरवा पर्यंत जो घोटाळा २२ कोटींचा होता असे सांगितले जात होते, तो आता चक्क २६ कोटींवर पोचला आहे. अगोदर विविध योजनांच्या दोन बॅंकांमधील २२ कोटी ८७ लाखांच्या रकमेचा अपहार झाला होता, मात्र हा अपहार २६ कोटींवर पोचला आहे.
सन २०१५ ते २०२२ या सात वर्षात जलयुक्त शिवार अभियानात हा घोटाळा झाला. महसूल शाखेचा कारकून मनोज फुलेबोयणे याने हा घोटाळा केल्याचे सांगितले जात आहे. या फुलेबोयणेने जलसंधारण अधिकाऱ्यांना १२ लाख २७ हजार २९७ रुपयांचा एक आणि ४१ लाख ६ हजार रुपयांचा दुसरा असे दोन धनादेश दिले होते.
या दोन धनादेश आरटीजीएसने वितरीत करायचे होते. मात्र खात्यात केवळ ९६ हजार शिल्लक दिसल्याने हा घोटाळा समोर आला. मग कलेक्टरांनी या खात्यांचे लेखापरीक्षण केले. त्यामधून मनोज फुलेबोयणे याने अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शिक्क्यांचा गैरवापर केल्याचे दिसून आले.
तत्कालीन तहसीलदार महेश परांडेकर यांनी लातूर एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली. ज्यामध्ये मनोज फुलेबोयणे, त्याचा भाऊ अरूण फुलेबोयणे, सुधीर देवकते, चंद्रकांत गोगडे या चौघांचा समावेश होता.
मनोज फुलेबोयणे याने या धनादेशांचा वापर त्याच्या भावाच्या म्हणजे अरूणच्या खात्यात भरण्यासाठी त्याने केला. यामध्ये वेगवेगळ्या कृषी केंद्रे, अॅग्रो एजन्सीच्या खात्यांवर हे पैसे वर्ग केले.
फक्त मनोज फुलेबोयणे यात सहभागी असेल?
लातूरच्या जाग्या झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता यामागचे सूत्रधार शोधण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत मनोजला अटक झाली आहे, त्याचा आणखी एक साथीदार चंद्रकांत गोगडे यालाही अटक केली आहे. मात्र खरोखरच एक कारकून सात वर्षे असा अपहार करू शकतो?
जिल्हाधिकाऱ्यांनी आता या काळातील सहा तहसीलदारांच्याही खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र ही साखळी खरोखरच एवढी छोटी असेल असे म्हणले तर ते धाडसाचे ठरेल.