लातूर – महान्यूज लाईव्ह
अडीच वर्षापूर्वी घडलेली ही घटना.. सामान्यांच्या दृष्टीने कोणाला खेद ना खंत या स्वरुपाची.. पण रुग्ण हक्क समितीने केलेला पाठपुरावा, समाजाचे भक्कम पाठबळ आणि जिल्हा ग्राहक मंचाने दिलेला सुयोग्य न्याय यामुळे लातूर जिल्ह्यातील किल्लारीनजिकच्या रेवती सतीश गावकरे या मृत महिलेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. जिल्हा ग्राहक मंचाने रेवतीच्या कुटुंबियांना ४० लाख रुपयांची भरपाई द्या असा आदेश लातूरमधील डॉक्टर विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी या दांपत्याच्या आशिर्वाद हॉस्पिटलला दिला आहे. गेली ११ महिने याची सुनावणी जिल्हा ग्राहक मंचात सुरू होती.
घरकाम करताना खुब्याचे हाड मोडल्याने रेवती यांना डॉ. सूर्यवंशी यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली ,मात्र त्या या शस्त्रक्रियेतून बाहेर आल्याच नाहीत. डॉक्टरांनी त्या कोमात गेल्यानंतर त्यांना परस्पर दुसऱ्या दवाखान्यात हलवलं. तिथे मात्र त्यांचं निधन झाल्याचं नातेवाईकांना कळाले.
रेवती या नणंद गावात त्यांचे वडील मोहन पाटील यांच्याकडेच राहत होत्या. त्यांना दोन लहान मुले होती. किल्लारी येथे खासगी ठिकाणी त्या काम करीत होत्या. मात्र त्यांच्या निधनाने वृध्द आजोबांवर नातूंना सांभाळण्याची वेळ आल्याने रुग्ण हक्क समितीने हे प्रकरण गांभियाने घेतले आणि न्यायालयाकडे पाठपुरावा केला. यातून न्यायालयाने सकृतदर्शनी हे प्रकरण गुन्ह्याशी संबंधित असल्याचे नमूद करीत लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर रुग्ण हक्क समितीने हे प्रकरण जिल्हा ग्राहक मंचाकडे दाखल केले. समितीचे अध्यक्ष अॅड. निलेश करमुडी व विधी सल्लागार अॅड. अभय पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला. ग्राहक मंचात यासंदर्भात दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. यानंतर ग्राहक मंचाने दोन्ही मुलांसाठी प्रत्येकी २० लाख रुपये व मानसिक त्रासाबद्दल १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.