मुंबई – महान्यूज लाईव्ह
अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा बहुचर्चित २० हजार कोटींचा एफपीओ बाजारात आणतानाच हिंडेनबर्गने साऱ्या अपेक्षांवर पाणी फिरवले. बजेट सादर झाल्यानंतरही अदानींचा शेअर काही वधारलाच नाही. अखेर सारी परिस्थिती लक्षात घेत लाखाचे बारा हजार नाही, तर शून्यावर येण्यापेक्षा वेळीच निर्णय बरा म्हणून अदानी एंटरप्रायझेसने २० हजार कोटींचा एफपीओ मागे घेतला. आतापर्यंत जेवढी गुंतवणूक यामध्ये गुंतवणूकदारांनी केली आहे, ती परत करण्याचा निर्णय अदानी एंटरप्रायझेसने घेतला आहे.
अर्थसंकल्पाच्या दिवशीच अदानी एंटरप्रायझेसने ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अदानी एंटरप्रायझेसवर मोठी नामुष्की आहे. हा प्रकार म्हणजे देशावरचा हल्ला असा कांगावा अदानी समूहाने केला, मात्र कोणतीही सरकारी यंत्रणा अदानी समूहाच्या थेट पाठीशी उभी राहीली नाही. तर दुसरीकडे हिंडेनबर्गने याला उत्तर देताना भारत एक मोठी महाशक्ती आहे, तिच्या राष्ट्रवादाशी आपण केलेली फसवणूक जोडणे हास्यास्पद असल्याची टिका केली होती. त्यानंतरही बाजारातून अदानींच्या घसरणीत काहीच फरक पडला नाही.
हा एफपीओ २७ जानेवारीला उघडला होता. त्यातून २० हजार कोटींची रक्कम गोळा करण्याची अदानी समुहाची योजना होती. मात्र नेमक्या त्याच वेळी अमेरिकन हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने एक अहवाल बाजारात प्रसिध्द केला आणि भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाच्या अवघ्या तीन दिवसांत चिंध्या उडाल्या.
शेअर बाजार हाताळून, आपलेच शेअर आपल्याच इतर कंपन्यांमध्ये वळवून अदानी समूहाने आपली संपत्ती फुगवली असा दावा या हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आला आणि अदानींच्या साम्राज्याला घरघर लावली.