सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरातील प्रचंड रहदारीच्या जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनावर वाहतूक पोलीसांची कारवाईची मोहीम सुरू आहे. मात्र काही वाहनचालकांना या कारवाईची फिकीर नाही. पोलीस कारवाईलाही ते जुमानत नाहीत.
काल तर स्कॉर्पिओ चालकाने कहरच केला. काल सकाळी साडेअकरा वाजता रहदारीच्या रस्त्यावर बाबा चौकात रस्त्यावर स्कॉर्पिओ उभा करून गाडीचालक निघून गेला. मग काय आपोआप ट्रॅफीक जाम झाले. अनेक वाहने अडकून पडली. त्यातच भर म्हणून कालठण रस्त्यावरून चौकात ऊसाचा ट्रॅक्टर रस्ता ओलांडताना रस्त्यावरच आडवा आल्याने दुतर्फा वाहने अडकून पडली.
इंदापूर शहरात नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच काही वाहन चालक दुसऱ्यांचा विचार न करता आपण कारवाई ला घाबरत नसल्याचा आव आणत आहेत. काल सकाळी साडेअकरा वाजता रहदारीच्या इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुना पुणे- सोलापूर मार्गावर बाबा चौकात एका स्कार्पिओ चालकाकडून आपली स्कॉर्पिओ वाहनांना अडथळा होईल अशी लावत तो निघून गेला.
अशावेळी कालठाण रस्त्यावरून बाबा चौकातून पुणे दिशेने ऊस भरून जाणारा ट्रॅक्टर त्या गाडीमुळे अडकला. त्यामुळे सोलापूर वरून पुण्याकडे व पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने त्याचप्रमाणे जवळच्या गावांना जाणारी वाहने बराच वेळ अडकून पडली. त्यामुळे ट्रॅफिक जाम व वाहनांचा हॉर्नचा आवाज यामुळे चौकात गोंधळ निर्माण झाला. अनेक लोकांना वेळेत ऑफिस कामासाठी व इतर कामासाठी वेळेत जायचे असल्याने त्यांना नाहक ट्राफिक जामचा फटका बसला.
इंदापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील बाबा चौक हा प्रचंड गजबजलेला चौक असतो. या चौकामध्ये वाहनांची खूप मोठी रहदारी दिसून येते. येथे अनेक अपघात होत असतात. अशा गजबजलेल्या व रहदारीच्या चौकात वाहने उभे करून निर्धास्तपणे गावात फिरणा-या स्कार्पिओ चालकाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
अनेकांनी वाहनावर कारवाईची मागणी केली. दरम्यान ट्रॅफिक ज्यामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतिश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद काळे यांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली व संबंधित स्कॉर्पिओवर दंड आकारल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.