मुंबई – महान्यूज लाईव्ह
सन २००० ते २००५ या दरम्यान वेळोवेळी बलात्कार केल्याच्या घटनेत तुरुंगात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम याच्यावरील गुन्हा सिध्द झाला आहे. आज (मंगळवारी) गांधीनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सकाळी अकरा वाजता आसाराम ला शिक्षा सुनावणार आहे. ही शिक्षा नेमकी काय असेल याची उत्सुकता आहे.
आसारामने सुरतमधील दोन मुलींवर बलात्कार केल्याचा गुन्हा २०१३ मध्ये दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी गांधीनगर कोर्टात सुरू होती. या घटनेत ७ जण आरोपी होते. यामध्ये आसारामची बायको लक्ष्मी, मुलगी भारती यांचाही समावेश होता. मात्र त्यातील सहा जणांना कोर्टाने निर्दोष ठरवत आसारामला मात्र दोषी ठरवले आहे.
विशेष म्हणजे आसाराम ने केवळ एवढेच प्रकार केलेले नाहीत, तर जोधपूर येथील आश्रमातही अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केल्याची घटना घडली होती व त्या प्रकरणात आसारामला कोर्टाने शिक्षाही ठोठावली आहे, तेव्हापासून आसाराम हा तुरूंगातच आहे.
तब्बल ९ वर्षानंतर आता सूरतच्या मुलींच्या घटनेचा निकाल लागतोय, त्याचा निकाल आज मंगळवारी सकाळी लागणार आहे. त्यामध्ये कोर्ट नेमकी काय शिक्षा ठोठावते याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्रातही आसारामचे फोटो आजही घराघरात..
आसाराम हा जोधपूरच्या घटनेत दोषी ठरल्यानंतरही व त्याच्याविरोधात अजूनही सुनावण्या सुरू असतानाच आसारामची भक्तांच्या मनातील जागा कायम असल्याचे दिसते. आसारामचे फोटो आजदेखील महाराष्ट्रातील अगदी ग्रामीण भागातही लावलेले दिसतात.