दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सातारा एलसीबीची आणखी एक धडाकेबाज कामगिरी समोर आली असून एका अट्टल चोराकडून १७ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून ३४ लाख ७२ हजाराचे ६२ तोळे सोने हस्तगत केले आहे
जिल्हा पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय अंकुश मदने याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून १७ घराफोड्या उघडकीस आल्या असून ३४ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ६२ तोळे सोन्याचे व ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्यातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार देवकर यांनी फौजदार अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते.
त्यावेळी पोलीस अभिलेखावरील आरोपी संजय अंकुश मदने (रा. वडूथ, ता. सातारा) यास कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १३ लाख ७९ हजार किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १९ लाख ७९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी संजय मदने याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदारांनी वडूथ, बोरखळ, मालगाव, जळगाव, तडवळे, खेड, नांदगिरी, चिमणगाव, देहूर, वाठार या गावांमध्ये घरफोड्या केल्या असल्याचे सांगितले.
या आरोपीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ३५८, ३८० या गुन्ह्यांमध्ये वर्ग करून त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी सातारा तालुका, कोरेगाव व वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ घरफोड्या केल्याचे तपासात कबूल केले आहे.