दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाईत एका रिक्षासह १ लाख २० हजारांची बेकायदेशीर दारु जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईतून बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.
वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास एका रिक्षातून वाई पोस्ट ऑफिस ते बावधन नाका
रस्त्यावर दारुची विनापरवाना वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी तातडीने फौजदार सुधीर वारुंज, डिबी पथकाचे प्रमुख विजय शिर्के, महिला हवलदार सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड या पथकाला बोलावून घेऊन या पथकाला सूचना केली. लगेचच फौजदार सुधीर वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास वरील पथकाने सापळा लावला.
रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा (क्रमांक एम.एच.११ ए.जी.८५३) ही भरघाव वेगाने जात असताना वरील पथकाने ती द्रविड हायस्कूल समोर अडवून त्याची तपासणी केली असता मागील सीटवर देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स आढळून आले.
रिक्षा चालक अविनाश आनंदराव सपकाळ (वय ४८ रा. यशवंतनगर, वाई) यास पथकातील पोलिसांनी दारु विक्रीचा परवाना आहे का? असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. मग पथकाने रिक्षासह दारुचे बॉक्स जप्त करून वाई पोलिस ठाण्यात आणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास विजय शिर्के हे करीत आहेत.