जिरेगाव येथील युवकाच्या खुनातील तीन संशयित आरोपींना बारा तासांत केले जेरबंद!स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौड तालुक्यातील जिरेगाव येथे जिरेगाव – बारामती रोड लगत बारामती तालुक्यातील एका युवकाचा खून केला प्रकरणी तीन संशयित आरोपींना पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे तीनही आरोपी दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील असून दारू पिण्याच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व उपपोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी दिली.
किशोर उर्फे मोन्या सोमनाथ खंडाळे ( वय २३), शुभम उर्फे बाबा उद्धव कांबळे (वय २३ ) गणुजी उर्फे आबा रमेश खंडाळे (वय २६ ) (तिघेही रा कुरकुंभ ता.दौंड जि.पुणे.) अशी या आरोपींची नावे आहेत. कुरकुंभ – बारामती रस्त्यांपासून काही अंतरावर जिरेगाव ते भोळोबावाडी रस्त्यालगत एका २५ ते ३० वयाच्या युवकाचा रविवारी ( दि.२९) मृतदेह आढळून आला होता.
या युवकाचा खून करून मृतदेह याठिकाणी आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज दौंड पोलिसांनी व्यक्त केला होता. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खून का झाला असावा किंवा कोणी केला असावा याचा अवघ्या बारा तासाच्या आत उलगडा करीत तीन आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी केली.
प्रफुल्ल उर्फ मोनू राजेंद्र बारावकर ( वय २६ रा खंडोबानगर बारामती , बारामती जि पुणे) या युवकाचा खून केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हातात घेताच प्रफुल्ल याचा खून करणाऱ्या त्याच्याच मित्रांना ताब्यात घेतले.
मयत प्रफुल्ल व आरोपी हे कुरकुंभ येथील एका हॉटेलमध्ये एकत्र दारु पिण्यासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यात दारू पिऊन वाद झाल्यामुळे आरोपींनी प्रफुल्ल यास दौड – कुरकुंभ रोडवरील कुरकुंभ घाटात येथे नेऊन जीवे मारुन मृतदेह कुरकुंभ – बारामती रोडवर असणारे जिरेगाव येथे रस्त्याच्या कडेला टाकून दिला. अशी कबुली या आरोपींनी या पथकाला दिली आहे.
सुरवातीला या आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच त्यांचेकडील माहितीमध्ये विसंगती आढळून आली. मात्र त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रफुल्ल बारावकर याच्या खुनाची कबुली दिली. या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुढील तपासासाठी दौड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, दौंड
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे , अमित सिद पाटील, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, काशिनाथ राजपुरे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, असिफ शेख, राजू मोमीन, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, पोलीस शिपाई अक्षय सुपे, धिरज जाधव आदीनी ही कामगिरी केली.