घनश्याम केळकर, बारामती
महान्यूज लाईव्ह विशेष
प्रार्थनेसाठी उशीर झालेले गांधी घाईघाईने प्रार्थनासभेसाठी निघाले असताना अचानक नथुराम वाटेत आला. तो गांधींच्या पायाशी वाकला असताना गांधींची नात आभाने त्याला पाया न पडण्यासाठी अडवले. त्याने आभाला एक धक्का दिला. त्या धक्क्याने आभा बाजूला पडली. नथुरामने पिस्तुल काढले आणि गांधीच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. गांधी खाली कोसळले. त्यावेळी घड्याळ वेळ दाखवत होते ते सायं. ५. १७. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शेवटचे शब्द होते ‘ हे राम ‘. तो दिवस होता ३० जानेवारी.
काही दिवसांपूर्वीच्या एका प्रार्थनासभेत गांधी म्हणाले होते, ‘ जर कोणीतरी माझ्यावर अगदी जवळून गोळी झाडेल आणि मी हसत हसत मनामध्ये रामाचे नाव घेत त्या गोळ्यांचा सामना करेन तर मी खरोखरच प्रशंसेस पात्र असेन.” गांधीवर हल्ल्याचा पहिला प्रयत्न २० जानेवारी रोजी झाला होता, तेव्हापासूनच्या १० दिवसात गांधीनी जवळपास १४ वेळा आपल्या मृत्यूचा उल्लेख केल्याच्या नोंदी आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जगातील सर्व देशांचे राष्ट्रध्वज फडकत असतात. ज्यावेळी एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखाचे निधन होते, त्यावेळी त्या देशाचा राष्ट्रध्वज निम्म्यावर उतरविला जातो. ज्यावेळी गांधींच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी त्यावेळच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचीवांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजासह सर्वच देशांचे राष्ट्रध्वज निम्म्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला. खरे पाहिले तर गांधी त्यावेळी भारतातही कोणत्याही पदावर नव्हते. ही कोणा राष्ट्रप्रमुखाची हत्या नाही, तर संपूर्ण मानवतेचीच हत्या आहे, अशा शब्दात संबंधित सचीवांनी याबाबचे स्पष्टीकरण दिले होते.
त्याच वेळी पाकिस्तानचे अध्यक्ष मोहंमद अली जीना यांनी प्रेसला पाठविलेल्या शोकसंदेशात गांधींचा उल्लेख ‘ हिंदूचे नेते ‘ असा केला. त्यावेळी त्यांच्या सचीवांनी गांधीचे कार्य केवळ हिंदूपुरतेच मर्यादीत नाही. त्यांना केवळ हिंदूचे नेते म्हणणे योग्य ठरणार नाही, असे जीनांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतू जीनांनी आपला हट्ट सोडला नाही.
गांधींना प्रार्थनासभेस येण्यास उशीर होण्याचे कारण होते सरदार पटेल. नेहरुंशी होत असलेल्या आपल्या मतभेदांबाबत गांधीशी बोलण्यासाठी ते आले होते. या अत्यंत गंभीर चर्चेत वेळ निघून गेल्याचे गांधीनाही लक्षात आले नाही. गांधी वेळेचे अत्यंत पक्के होते. ५ वाजताच्या पार्थनेला १० मिनिटाहून जास्त वेळाचा उशीर झाला होता. ज्यावेळी गांधीच्या हे लक्षात आले त्यावेळी ते तातडीने उठले आणी घाईघाईने जवळच असलेल्या प्रार्थनासभेकडे निघाले. जातानाच ते त्यांच्या दोन्ही नाती आभा आणि मनु यांनाही उभीर झाल्याचे न सांगितल्याबद्दल रागावले. उपवासाने अशक्त झालेले गांधी आपल्या या दोन्ही नातींच्या खांद्यावर हात ठेवून घाईघाईने प्रार्थनासभेकडे निघाले होते. त्यावेळेसच नथुराम त्यांना सामोरा आला.