नायक बारामतीच्या समृद्धीचे – खंडेरावआण्णा कोकरे
विक्रम शिवाजीराव जगताप आणि घनश्याम केळकर
पणदऱ्याच्या खडकावर काय काय उगवले याच्या शोधयात्रेत सापडलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे खंडेरावआण्णा कोकरे. कालाय तस्मेन म: असे म्हणले जाते ते उगाच नाही. नाहीतर पणदऱ्यात खंडेरावआण्णांसारखा माणुस होऊन गेला हे समाजाच्या विस्मृतीत गेले नसते. २० व्या शतकात उगवलेल्या आण्णांची लाईफस्टाईट २१ शतकाला अनुरुप राहिली. त्यांनी नेहमी दूरचे पाहिले. आपल्या मुलाबाळांना आणि भोवतालच्या समाजालाही ही दृष्टी देण्यासाठी त्यांची धडपड राहिली.
खंडेरावआण्णांचे वडिल इंग्रजी काळातील पोलीस शिपाई. अवघी अर्धा एकर शेती. वडिलांना नोकरीच्या आधारेच संसार चालत असे. पण आण्णांच्या वयाच्या ६ व्या वर्षीच त्यांचे वडील वारले आणि तेव्हापासून त्यांच्या खांद्यावरच कुटुंबाची जबाबदारी पडल्यासारखी झाली. खरेतर ते घरात सगळ्यात लहान, पण जे मोठे भाऊ होते, त्यांनी घरच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याने वयाच्या सातव्या वर्षापासून आण्णांना दुसऱ्याच्या दारात दारी धरायला जावे लागले. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत अशाच प्रकारचे जगणे त्यांच्या नशिबी होते. तोपर्यंत त्यांच्या दोन मोठ्या बहिणींची लग्ने झाली होती. त्यांची बहिण मुंबईत होती. तिने त्यांना मुंबईला नेले. तिथे एक बैलगाडी घेऊन दिली आणि हमालीचे काम दिले. आण्णांना शिकण्याची मोठी आवड होती. मुंबईतही ते रात्रीच्या शाळेत जात, विशेष म्हणजे या रात्रीच्या शाळेत ते संस्कृत शिकत होते. मुंबई तेव्हाही देशातील एक विशाल असे कॉस्मॉपॉलीटीयन शहर होते. मुंबईने आण्णांना एक विशाल दृष्टी दिली.
आण्णांना प्रेरणा देणारी पहिली व्यक्ती म्हणजे त्यांची बहिण. सहाफुटाहून जास्त उंची असलेली थिप्पाड व्यक्तिमत्वाची ही बाई त्यावेळच्या मुंबईत एक मोठा उद्योग स्वत: चालवत होती. मुंबईच्या गोदीत येणारा माल लोडींग अनलोडींग करण्याचा हा उद्योग होता. १९०० ते १९१० चा तो काळ होता. त्यावेळी या कामासाठी बैलगाड्या हेच साधन होते. २०० बैलगाड्या, त्यासाठीचे ४०० बैल, त्यासोबत रिझर्व्ह ठेवलेले १०० बैल असे एकुण ५०० बैल. या कामावर असणारे ३०० हून जास्त कामगार असा सगळा बारदाना. खरे तर आजच्या घडीलाही या लोडींग अनलोडींगचा सगळा व्यवसायात चुकूनसुद्धा स्त्रिया दिसत नाही. पण शंभराहून जास्त वर्षापुर्वी एक बाई समर्थपणे हा व्यवसाय सांभाळत होती.
१९२० साली ज्यावेळी मुंबईच्या सरदारगृहात टिळकांचे निधन झाले, त्यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला होता. त्याच्यात अगदी तरुण वयातील खंडेरावआण्णाही होते. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून हिणवले गेलेल्या टिळकांनी त्यांच्या आयुष्यात असंख्य जणांना देशभक्तीची प्रेरणा दिली. त्यांच्या मरणानेही अनेकांची ह्दये देशभक्तीच्या भावनेने हेलावून टाकली. त्या अंतयात्रेतून धनगर समाजातील आण्णाही एक प्रेरणा घेऊन परतले.
यानंतर त्यांनी पणदऱ्याला परतण्याचा निर्णय घेतला. परत आले त्यावेळी नीरा कॅनॉल सुरु होऊन पाण्याची व्यवस्था झालेली होती. आण्णांनी आता मोठ्या उत्साहाने शेतीत लक्ष घातले. त्यांची बहिण त्यांच्यामागे खंबीरपणे उभी होती. त्यांनी स्वकष्टाने शेती वाढवली. पुढच्या काही दशकातच केवळ पणदऱ्यातीलच नव्हे तर बारामतीच्या परिसरातील श्रीमंत व्यक्तीमध्ये खंडेरावआण्णाचे नाव घेतले जात होते. त्याकाळच्या पणदऱ्यात दोन फियाट गाड्या होत्या, त्यातली एक खंडेरावआण्णांकडे होती. त्यांची मुले त्याकाळी मोटारसायकलवरून कॉलेजला जात होती. पणदऱ्यात चार चुलवणाची दोन गुऱ्हाळे ते चालवत होते. शेकडो टन ऊसाचे गाळप करत होते. शेकडो लोकांना रोजगार देत होते.
पण केवळ पैसा मिळविण्यात आणि अधिकाधिक श्रीमंत होण्यात त्यांनी आयुष्य घालवले असते तर त्यांच्यावर आज हा लेख लिहण्याची काहीच गरज नव्हती. आज त्यांचे नाव घेण्याचे कारण त्यांनी बारामतीत शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांसाठी एक हॉस्टेल काढले म्हणून. एका दलित बॅरिष्टरची बारामतीच्या रस्त्यावरून सन्मानाने मिरवणूक काढण्याचे धाडस दाखवले म्हणून. इंदापूर रोडवर अहिल्या होस्टेल या नावाने हे हॉस्टेल होते. आण्णा स्वत: धनगर समाजाचे. त्यांनी आपल्या समाजाला सोबत ठेवून हे हॉस्टेल काढले. पण पुढे जाऊन त्यांनी ज्यावेळी दलितांसह इतर बहुजनांच्या मुलांनाही या हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्याच धनगर समाजाने त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याची भाषा वापरली गेली. अर्थात आण्णा याला अजिबात बधले नाहीत आणि त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर हे हॉस्टेल चालू ठेवले.
समाजातील वंचितांसाठीचा हा उमाळा त्यांना गाडगेबाबांपर्यंत घेऊन गेला. गाडगेबाबा त्यांचे श्रद्धास्थान. याच गाडगेबाबांनी त्यांना मुंबईला नेऊन एका मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख घडवून दिली. त्या व्यक्तीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तेव्हापासून आण्णांचे डॉ. आंबेडकरांवर प्रेम जडले. या त्यांच्या भेटीच्यावेळीच तिथे असलेल्या लोकांसोबत बाबासाहेबांची धर्मांतराबाबतची चर्चा सुरु होती. तीदेखील त्यांनी त्यावेळी ऐकली.
पुढे बाबासाहेब शिक्षण परिषदेसाठी बारामतीत आले त्यावेळी खंडेरावआण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बारामतीत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला. बारामतीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. एका दलिताचा असा जाहीर सन्मान त्यावेळच्या प्रस्थापितांना मान्य होणे शक्यच नव्हते. अर्थात या मिरवणूकीला विरोधही झाला. पण आण्णा मागे हटले नाहीत. अहिल्या हॉस्टेल चालविणारे धायगुडे गुरूजी हे आण्णांचे सहकारी. याच धायगुडे गुरुजींनी बारामतीतील पहिली गृहनिर्माण सहकारी संस्था काढली. यातून दलीत समाजाला घरे मिळाली. ही सोसायटी आजही बारामतीतील आमराईत आहे.
खंडेरावआण्णांसारखी व्यक्ती राजकारणापासून अलिप्त राहणे शक्यच नव्हते. आण्णांनी त्यांच्या डोळ्यादेखत स्वातंत्र्याचा सुर्य उगवताना पाहिला. पण त्यापूर्वीपासून ते राजकारणात होते. पणदरे गावचे ते २० वर्षे बिनविरोध सरपंच राहिले. त्यानंतर त्यांची स्वइच्छेने त्या पदाचा त्याग केला. १९४२ साली ते जिल्हा लोकल बोर्डाचे सरकारनियुक्त सभासद होते. डॉ. आंबेडकरांचे सहकारी असलेल्या आण्णांचे कॉग्रेसशी पटणे शक्यच नव्हते. स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची साथ दिली. १९५२ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शेका पक्षाच्या जगताप ढाकाळकरांसाठी प्रचार केला. पण कॉंग्रेसचे गुलाबराव मुळीक निवडून आले. पण पुढच्या १९५७ च्या निवडणुकीत मात्र शेका पक्षाला यश मिळून नानासाहेब जगताप ढाकाळकर निवडून आले. पण देशभर कॉंग्रेसचे वारे होते. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेतृत्व होते. त्यापुढे इतर पक्ष निष्प्रभ होऊ लागले. बारामतीच्या राजकारणातही शरद पवारांचा उदय झाला. मग खंडेरावआण्णाही राजकारणातून अलिप्त झाले. त्यानंतरही त्यांना अनेकदा आग्रह होऊनही त्यांनी पु्न्हा राजकारणाची वाट धरली नाही.
त्यांच्या उदारपणाच्या आणि प्रेमळ स्वभावाच्या अनेक आठवणी त्यांचे कुटुंबिय सांगतात. त्यांच्या एका मित्राला मुलबाळ नव्हते, त्यांनी आपला मोठा मुलगा आपल्या मित्राला दत्तक दिला. आणि सोबत त्या मुलाच्या नावावर काही जमीनही करून दिली. त्यांना लहान मुलांचा फार लळा. अगदी आपल्या शेतातल्या मजुरांच्या मुलाबाळांना ते मांडीवर घेऊन बसत. त्यांच्या शेतात असणाऱ्या विहीरीवरील इंजिनावर काम करणारा एक इंजिन ड्रायव्हर होता. तो सकाळ संध्याकाळ आपल्या लहान मुलीला घेऊन आण्णांच्या घरी येत असे. आण्णा त्या मुलीशी घरातल्यासारखे खेळत असत. काही दिवसांनी तो इंजिन ड्रायव्हर दुसरीकडे कामासाठी निघून गेला. पण त्या मुलीला आण्णांचा एवढा लळा होता, की त्यांच्या आठवणीने ती आजारी पडली, तिला ताप चढला. शेवटी तो इंजिन ड्राव्हयर त्या लहान मुलीला आण्णांना भेटविण्यासाठी घेऊन आला. आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनाही आण्णा प्रेमाने वागवत. अशाच एका मजुराच्या मागेपुढे कोणी नव्हते. आण्णांनी स्वत: पुढाकार घेऊन त्याचे लग्न लावून दिले.
आण्णांना चीड होती ती खोटेपणाची आणि ढोंगीपणाची. असा काही खोटेपणा दिसला ती त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जात असे. मुक्याचे सोंग घेऊन त्यांच्या शेतावर भीक मागण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना त्यांनी चक्क झाडाला बांधून ठेवले. ज्यावेळी तुम्हाला बोलता येईल त्यावेळेसच सोडेन असे म्हणल्यावर हे मुकेही पटापटा बोलू लागले.
त्यांना जसे भीक मागणे पसंत नव्हते तसे अंगात येणे, देवाला कोंबडे, बकरे कापणेही अजिबात पसंत नव्हते. अशा गोष्टींना ते जोरदार विरोध करीत. यामागेही गाडगेबाबांची प्रेरणा असावी. देव काय कुणाच्याही अंगात कसा येईल. देव अंगात येण्यासाठी माणूस किती पवित्र पाहिजे असे ते म्हणत असत. बकऱ्या, कोंबड्याची लालूच देऊन कुठे देव प्रसन्न होत असतो का, असे ते म्हणत. त्यांच्या जवळच्या नातगलाच्या लग्नात आण्णांनी देवाच्या नावाखाली बकरी कापायला विरोध केला आणि बकरी कापू दिली नाही. त्याच रात्री आण्णांच्या घरी चोरी झाली. लोक म्हणू लागले की बकरे कापायला विरोध केला म्हणूनच देवाने ही प्रचिती दिली. पण आण्णा मात्र ठाम होते. ते म्हणाले, माझ्या घरी चोरी झाली ते मी बघीन, तुम्ही मात्र ही प्रथा सोडून द्या. देवासाठी बकरे कापू नका, तेव्हापासून त्या घरातील ही प्रथा बंद पडली.
कांबळेश्वरच्या भिवाईदेवीच्या यात्रेत धनगर समाजाच्या अनेक महिलांच्या अंगात येत असे. या महिला नदीत आंघोळ करून ओल्या वस्त्रानिशी नाचत नाचत देवीच्या देवळात जात असत. हे बघून आण्णांच्या तळपायाची आग मस्तकात जात असे. एका वर्षी ते हातात जाडजुड काठी घेऊनच तिथे बसले. बाई असो वा पुरुष, बघु कुणाच्या अंगात येते, फोडूनच काढतो असा दम भरल्यानंतर त्या भीतीनेच सगळ्यांच्या अंगातील देव पळून गेला.
आणणांची विनोदबुद्धीही अनेकदा जागृत होई. घरच्या भाकरी करपल्या, त्यावर काळे डाग पडले तर म्हणत, आपल्याला तुळजापूरला जावे लागतेय, भाकरीला नायटे आलेत. मीठ जास्त पडले तर तु आज मीठाचे पोते घेऊन आलीस असे म्हणत असत.
ज्यांच्या घरच्या कार्यक्रमात पहिली पगंत बसायची ती गोरगरीबांची. नंदीवाले, वडारी, गोसावी यांची. तेदेखील त्यांच्यातच जेवायला बसणार. खरेतर अशा कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे अनेक प्रतिष्ठीत आणि नामांकीत व्यक्ती येत असत. पण त्यांच्या व्यवस्थेला ते आपल्या मुलांना लावीत आणि स्वत: या गोरगरीबांबरोबर बसत असत. त्यांच्या शेतातील आंबा, पेरू, केळीच्या बागातील एकही फळ बाजारात विक्रीसाठी नव्हते तर गोरगरीब, शेजारी पाजारी, पाव्हणे रावळे, यांना वाटण्यासाठी होती.
आपल्या एका मुलीला डॉक्टर असलेल्या मुलालाच द्यायचे हा त्यांचा हट्ट होता. मुळातच त्यावेळच्या धनगर समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी. त्यात डॉक्टर होण्यासाठीचे उच्चशिक्षण घेणारे तर हातावर मोजण्याऐवढे. पण त्यासाठी त्यांनी राज्यातच नाही तर राज्याबाहेरही शोध सुरु ठेवला. शेवटी त्यांना यवतमाळमध्ये सरगरांच्या घरात एक मुलगा सोलापूरला एमबीबीएस करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने यवतमाळ गाठले. अखेर त्यांनी डॉक्टर जावई मिळवलाच. त्याकाळी ज्याच्याकडे मोठी शेती तो घर श्रीमंत समजले जायचे, अशा घरात मुली देण्यासाठी चढाओढ असायची. आण्णांनी आपल्या सगळ्यात मोठ्या मुलीचे लग्न अशा घरात करून दिले. मात्र नंतर मात्र त्यांनी आपले जावई सुशिक्षित घरातीलच शोधले. त्यांच्या घरी किती शेती आहे याचा त्यांनी कधी विचार केला नाही. त्यांनी आपल्या मुलींनाही शिक्षण दिले. त्यांचे जावई उच्च पदावर पोचलेच. पण त्यांची नातवंडेही आता उच्चशिक्षण घेऊन देशापरदेशात मोठ्या मानाने जगत आहेत.
ते स्वत: चौथीपर्यंतच शिकलेले होते, पण आपल्या मुलांनीही खुप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या डोळयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श होता. आपला एकतरी मुलगा आयएएस व्हावा अशी त्यांची मनापासूनची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना जे हवे ते दिले. अगदी त्यांना परदेशातही जाण्याची संधी दिली. पण त्यांची ही इच्छा मात्र पुर्ण होऊ शकली नाही.
मात्र आपल्या मुलाला आयएएस करण्याची एक संधी त्यांच्याकडे चालून आली होती. स्वातंत्र्यापुर्वी पुण्याचा ब्रिटीश कलेक्टर कौंऊंटी एक दिवस त्यांच्याकडे मुक्कामाला होता. त्यावेळी त्याने आण्णांना तुमचा एक मुलगा माझ्याकडे द्या, मी त्याला आयएएस करतो अशी गळ आण्णांना घातली होती. पण यामध्ये मुलाला ख्रिश्चन धर्मात प्रवेश करावा लागेल असे गृहीतक होते. इंदापूरच्या बोरी गावातील त्यांच्या जवळच्या नातलगाने ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला होता. आण्णांना तो मार्ग अजिबात पसंत नव्हता. त्यामुळे त्यांनी यासाठी नकार दिला. होळकर संस्थानाच्या महाराजांनी एका परदेशी स्त्रीशी लग्न केले होते. त्या महिलेला हिंदू धर्मात घेण्यासाठीचा संस्कार समारंभ नाशिकमध्ये पार पडला. खंडेरावआण्णा त्या समारंभात एक पंच म्हणून उपस्थित होते.
स्वत: फारसे शिकलेले नसले तरी त्यांना सुशिक्षित बुद्धीमंताच्या सहवासात राहण्यात मनापासूनचे समाधान वाटत असे. भारतातील प्रसिद्ध न्यायमुर्ती छागला हे त्यांचे वकिल होते. मुंबईच्या हायकोर्टात त्यांच्या जमिनीच्या वादाच्या केस ते लढत होते. बारामती, पुणे, मुंबई येथे त्यांची ज्यांच्याबरोबर उठबस होती, ज्यांच्याशी त्यांचा जिव्हाळा होता, ते सगळीच घरे अशा सुशिक्षित आणि बुद्धीमंत लोकांची होती. त्यामध्ये बारामतीचे डॉ. नरवणे होते, जी.बी.पानसे होते. शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार हेदेखील त्यांच्या याच मित्रपरिवारात होते.
आण्णा गेले त्यावेळी पुढचे चार पाच दिवस जसे जसे लोकांना समजेल तसे लोक येत होते. महाराष्ट्र, कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आले. यामध्ये नंदीवाले, डवरी, गोसावी यासारख्या समाजातल्या तळागाळातील लोकांचा मोठा समावेश होता. आण्णांच्या आठवणी काढून ते हमसून हमसून रडत असत.
शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून पणदऱ्याच्या वतनाचा वाद सातारच्या छत्रपतींच्या दरबारात होता. त्याच्यावर न्यायनिवाडा करत छत्रपती शाहू महाराजांनी जगताप आणि कोकरे यांच्या अंतर्गत वादाचा विषय निकाली काढला होता. त्यानंतर पुन्हा ब्रिटश काळात पणदरे गावच्या पाटीलकीचा वाद समोर आल्यानंतर कोकर्यांनी जगतापांच्या विरोधात पाटीलकीचा हा वाद ब्रिटिशांच्या कोर्टात न नेता आपापसात सामोपचाराने तो मिटवावा अशी सामंजसपणाची भूमिका खंडेराव अण्णा कोकरे यांनी घेतली होती. या गोष्टीची विशेष आठवण खंडेराव अण्णांचे जेष्ठ चिरंजीव हनुमंत भाऊ कोकरे यांनी सांगितली. खंडेराव अण्णांनी स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तबगारीवर शेती व्यवसायाचा मोठा व्याप वाढवला. समाजकार्यात लक्ष घालून दीनदुबळ्या आणि मागास समाजातील लोकांकरिता कार्य केले. परंतू त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मात्र खंडेराव अण्णांचा वारसा पुढे नीट चालवता आला नसल्याची स्पष्ट कबुली त्यांचे जेष्ठ चिरंजीव व पुणे जिल्हा भाजपाचे माजी उपाध्यक्ष हनुमंत भाऊ कोकरे हे बिनदिक्कतपणे देताना दिसतात.
७२ सालचा दुष्काळ होता. त्यावेळी प्रसिद्ध कवी ग. दी. माळगुळकर हे आपल्या एका तरुण मित्राला भेटण्यासाठी पणदऱ्यात आले होते. या परिचिताच्या वडिलांना भेटण्यासाठी ते त्यांच्या शेतावर गेले त्यावेळी ८० वर्षाचा तो म्हातारा विहीर खणत होता. तीस फुट खोलीवर असलेल्या या विहीराच्या तळात उभा राहून तो मजुरांकडून काम करून घेत होता. ज्यावेळी या विहीरीच्या तळात सुरुंगाचे बार उडविले गेले. त्यावेळी हा म्हातारा विहीरीच्या काठावर बसून होता, पण गदिमा आणि बाकीच्यांना मात्र दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगत होता. हे दृश्य कवीमनाच्या गदिमांना एकदम हेलावून गेले. फार काही न बोलता ते तेथून निघून गेले. त्यानंतर दोन दिवसात गदिमांनी या म्हाताऱ्यावर लिहलेला एक लेख दैनिक सकाळच्या उषापान सदरात प्रसिद्ध झाला. गदिमांवर वाचकांच्या पत्राचा पाऊस पडला आणि या पत्रातून अनेकांनी या व्यक्तीला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात गदिमांनी म्हणले होते.
” माळेगावहून परत येताना ते वृद्ध गृहस्थ सारखे आठवत होते. त्यांना पाणी पाहिजे होते, समृद्धी पाहिजे होती. त्यांचे स्वत:चे आयुष्य अखेरीला आले होते, मग त्यांना समृद्धी हवी होती ती कोणासाठी? पुढच्या पिढीसाठी. ते स्वत: खुशाल विहीरीच्या काठावर बसले होते, आमच्यातल्या कुणाला सुरुंगाने उडालेल्या कपारीचा मार लागू नये यासाठी मात्र ते सावध होते. निसर्गाशी लढत जगणारी माणसेअशी कोणासाठी तरी जगतात म्हणून त्यांचे जगणे मोलाचे. त्यांचे नाव कोणाला ठाऊक असो वा नसो. “
या माणसाचे नाव होते खंडेरावआण्णा कोकरे.
( आपली माहिती या सदरात प्रसिद्ध करण्यासाठी कृपया ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा )