दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तंटामुक्त गाव समीती ही वाई तालुक्यातील गाव पातळीवरील एक छोटे न्यायालयच असावे, ते अशा प्रकारे नावारुपाला आणण्यासाठी गावांची एकजूट असणे महत्वाचे आहे असे मत वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी व्यक्त केले.
खानापुर (ता .वाई) येथील तंटामुक्त गाव समितीच्या स्वतंत्र कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजक व किसन वीरचे संचालक किरण काळोखे, सरपंच सौ .पुष्पा जाधव, उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक, युवा उद्योजक अमोल जाधव, महिला तलाठी सौ. शिर्के, प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
भरणे म्हणाले, गावागावात छोटी मोठी निर्माण होणारी भांडणे ही गाव पातळीवरच तंटामुक्ती समितीने मिटवली, दोन्ही तक्रारदारांना एकत्रीत बसवून तक्रारींचा विषय प्रतिष्ठेचा न करता योग्य न्याय दिला, तर पोलिस स्टेशन व कोर्टाच्या पायऱ्या तक्रारदारांना चढाव्या लागणार नाहीत.
आता याची संपूर्ण जबाबदारी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण जाधव, उपाध्यक्ष सागर जाधव व समितीमधील सर्व सदस्यांनी घेतल्यास खानापुर गावाचा नाव लौकिक वाढेल. आपल्या देशातील राज्यांनी नागरीकांच्या सहकार्याने हरीतक्रांती, नीलक्रांती, दुग्धक्रांती करुन राज्य व देशाला विकासाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. पैसा भरपूर आला, तसतसे गावागावांमध्ये दुर्दैवाने वाद विवाद, भांडणे, खुन, दरोडे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
वाटणीसाठी वाद निर्माण होऊ लागले .१५ ते २० वर्षापूर्वी आपला काळ वाईट होता. पुर्वी बांधांवरुन बैलगाड्या जात होत्या, आता इंचासाठी खून पडताना आपण पाहतो. याच न्यायासाठी पोलिस स्टेशन आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या अनेकांना पाहतो.
हे टाळण्यासाठी आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री कै. आर .आर. पाटील यांच्या कल्पनेतुन गाव तेथे तंटामुक्त गाव समितीचा जन्म झाला, गावातील तंटे मिटावेत यासाठी स्पर्धा तयार करुन जे गाव तंटामुक्त होईल अशा गावांना भरीव अशी बक्षिसांची मालिका सुरू केल्याने राज्यातील असंख्य गावांचे तंटे हे गावातच मिटत होते. हाच आदर्श खानापुर गावाने घेऊन गाव तंटामुक्त करावे असे आवाहन भरणे यांनी केले .