राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात सध्या कधी काय घडेल हे काय सांगता येत नाही, तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदी पात्रात तब्बल सात जणांचे निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ बारामती रस्त्यावर तालुक्यातील जिरेगाव हद्दीत एक घटना घडली आहे.
भोळोबावाडी रस्त्यावर एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह आणून टाकल्याची घटना आज निदर्शनास आली. दरम्यान हा युवक बारामती तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोनु बारवकर ( वय अंदाजे २५, पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) असे या मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत जिरेगाव तलावाच्या विरुद्ध बाजूला रस्त्याच्या कडेला एका पुरुषाच्या मृतदेह रविवारी (दि २९) आढळून आला. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. व परिसराची पाहणी केली.
हा युवक अंदाजे २५ वर्षाचा असून या युवकाला डोक्याला जबर मारहाण झाली असून छातीवरही जखमा आहेत. हा युवक बारामती तालुक्यातील असून त्याचा खून करून त्याला या ठिकाणी आणून टाकल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.