कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर सांगलीच्या राजकारणाची रीतच न्यारी.. शुक्रवारी आणि शनिवारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याचा अंदाज चांगला झाला असेल. कारण दोन दिवसात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वेगवेगळे कार्यक्रम होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकारणातील परस्पर संवादाचा एक सेतू कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पाहायला मिळाला.
शुक्रवारी रात्री नितीन गडकरी यांचे शनिवारच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आगमन झाले, मात्र कोल्हापुरातील त्यांच्या आगमनासाठी भाजपचे नेते आणि पदाधिकारी त्यांची वाट पाहत होते. पुष्पगुच्छ घेऊन थांबलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना तेव्हा धक्का बसला, जेव्हा जयंत पाटील हे गडकरी यांच्या कारमधून दुसऱ्या बाजूने उतरले.
यावेळी जयंत पाटील यांचे पुत्र हेदेखील त्यांच्या समवेत होते. आष्टा येथून जयंत पाटील हे गडकरी यांच्यासमवेत होते असे कळल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बहुदा इथेनॉलच्या प्रकल्पाच्या कामासंदर्भात ते गडकरी यांच्याशी चर्चा करत होते अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली.
मात्र कोल्हापूरच्या राजकारणाबाबत सजग असलेल्या पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीवर मौन धारण करणे पसंत केले. शरद पवार यांचेदेखील शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात आगमन झाले. त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार राजेश पाटील, ए वाय पाटील अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. दुसरीकडे खासदार धैर्यशील माने आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे गडकरी यांच्या भेटीसाठी एकाच गाडीतून आले होते.