सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पवार घराण्याशी एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष महारुद्र पाटील यांनी लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी अनेक आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी सोडली. महारुद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला का रामराम केला हे आज सांगणार आहेत.
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिंदे गटात सामील झाल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील नेते आणि पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले इंदापूर चे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी अनेक कार्यकर्ते शिंदे गटात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पाटील आज दुपारी याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या आठवड्यात महारुद्र पाटील यांच्याबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, वसंत आरडे, वरकुटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, बेलवाडीचे वैभव जामदार, भिगवणचे नवनाथ सुतार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश केला.