सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – तालुक्यातील राजकारणात सतत वादळे उठत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेले असतानाच आता आमदार दत्तात्रेय भरणेंनी भाजपला जोरदार धक्का दिला.
शनिवारी (दि. 28 जानेवारी) रोजी दगडवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान सरपंच स्वाती केसकर यांच्यासह पाच ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपला बाय बाय करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशाने दगडवाडी गावात भाजपला भगदाड पडले असून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आमदार भरणे यांनी या सर्वांचे स्वागत केले..
माजी सरपंच स्वाती आप्पासाहेब पारेकर, महादेव कवितके, पोपटराव काळे, चेअरमन विष्णू काळे, संजय केसकर, आप्पासो पारेकर, नाथा पारेकर, शंकर रासकर, शिवाजी रासकर, किसन मोठे, ग्रामपंचायत सदस्य श्री. कुदळे, श्री. बनकर, लक्ष्मण रासकर, हर्षदा काळे, सोमनाथ काळे, माणिक रासकर आदींसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला..
यावेळी महादेव कवितके म्हणाले की, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कामाचा झंझावात गावाने पाहिला. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे बोलणारे पदाधिकारी पक्षात आहेत म्हणूनच आम्ही प्रवेश केला आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही भाजप पक्षाचा सरपंच निवडून आणला होता, असे असताना आम्ही न मागता दगडवाडी सारख्या गावात आमदार भरणे यांच्याकडून भरपूर निधी मिळाला.
या गावाला निरवांगी ते दगडवाडी, तसेच सराफवाडी रस्ता अशी अनेक कामे भरणे यांनी मंजूर केली. या बद्दल दगडवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने आमदार भरणे यांचे कवितके यांनी आभार मानले. यापुढे आमदार भरणे यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी पक्षात काम करत राहू आणि पक्षाला इथून पुढील काळात जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
यावेळी दगडवाडी येथे श्रीक्षेत्र नंदिकेश्वर मंदिरास भेट देऊन मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच यावेळी “क” वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत डीपीडीसी च्या माध्यमातून मंजूर केलेल्या १५ लाख रुपयांच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजने करता मंजूर केलेल्या १ कोटी ७४ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
या पाणीपुरवठा योजनेमुळे दगडवाडी गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरणार असून नागरिकांना स्वच्छ घरपोच पाणी मिळणार आहे. तसेच दगडवाडी ते निरवांगी येथील रस्त्याकरिता 5 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे या कामाची प्रत्यक्षात सुरवात थोड्याच दिवसात सुरू होईल असेही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
या भूमिपूजन प्रसंगी प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, नंदकुमार रणवरे, छाया पडसळकर यांच्यासह निरवांगी, खोरोची, घोरपडवाडी, निमसाखर, चाकाटी, रेडा, तरंगवाडी, गोखळी, सराफवाडी, पिटकेश्वर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.