पुणे : महान्यूज लाईव्ह
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने पहिल्या दिवसापासून सुरू केलेला गल्ला आता तीनशे कोटींच्या पुढे पोचला आहे. भारतासह विदेशातही साडेआठ हजार स्क्रीनवर पठाण धुमाकूळ घालतो आहे. अशा परिस्थितीत अगोदर नकारात्मकरित्या चर्चा केलेला ‘पठाण’ कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थन असलेल्या गांधी गोडसे विचार युद्ध या चित्रपटाला मात्र भुईसपाट करणारा ठरला, मात्र त्या तुलनेत मराठी चित्रपट असलेला रितेश देशमुख चा वेड मात्र चांगलीच टक्कर देताना दिसतो आहे.
वेड चित्रपटाने पाचव्या आठवड्याच्या शुक्रवारपर्यंत 57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिस वर वेड चित्रपटाने या वीकेंडमध्ये चार कोटींची कमाई केली असून, पठाण समोर इतर चित्रपट भुईसपाट होत असताना वेड मात्र दमदार कामगिरी करत आहे.
वेड चित्रपटात रितेश- जेनेलिया या जोडीसह अशोक सराफ, सलमान खान, विद्याधर जोशी यांच्याही भूमिका आहेत. अर्थात राजकुमार संतोषी यांचा बिग बजेट असलेला गांधी गोडसे एक युद्ध हा चित्रपट देखील पठाणच्याच दिवशी प्रदर्शित झाला. तोही चित्रपट बहुचर्चित होता, मात्र या चित्रपटाला पठाण चित्रपटाने मोठा फटका दिला आहे.
बॉक्स ऑफिस वरील चर्चेनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 80 लाख रुपयांची कमाई केली, मात्र दुसऱ्या दिवशी ही कमाई 34 लाखावर आली. पठाण चित्रपटाच्या क्रेजमुळे गांधी गोडसे विचार युद्ध मात्र झाकोळला गेला. गांधी गोडसे या चित्रपटात चिन्मय मांडलेकर हा नथुराम गोडसे च्या भूमिकेत असून, दीपक अंतानी हा अभिनेता गांधींच्या भूमिकेत आहे.