दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाच्या दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बील रक्कम ७ कोटी २६ लाख ८९ हजार २३१ रूपये संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे नोंद असलेला संपूर्ण ऊस गाळपासाठी येत असून कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरीही आपला ऊस किसन वीर- खंडाळा कारखान्याकडे गळीताकरिता पाठविण्याबाबत किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्याकडे विनंती करीत असून त्यांचाही ऊस कारखाना गळितासाठी आणणार असल्याबाबत सांगितले आहे,
यावरून किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातीलच नव्हे तर कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांचाही आमदार मकरंदआबा पाटील यांच्या व्यवस्थापनावर विश्वास असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहनही कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.
किसन वीर-खंडाळा साखर कारखान्याकडे (दि. ११/११/२२ ते ३०/११/२२) या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये गळिताकरिता आलेल्या २९ हजार ०७५ मेट्रिक टनाची होणारी रक्कम ७ कोटी २६ लाख ८९ हजार २३१ रूपये संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला परिपक्क झालेला सर्व ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा असे आवाहनही किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.