दिल्ली – महान्यूज लाईव्ह
दक्षिण कर्नाटकातल्या अद्यानाडका गावच्या शेतमजूर अमाई महालिंग नाईक यांची ही कहाणी.. क्षणभंगूर आयुष्यातही तुम्ही समाजासाठी खूप प्रेरणादायी ठरू शकता.. तुम्ही कोणाच्याही अध्यात मध्यात नसा, तुम्ही तुमच्या अतुलनीय कामामुळे समाजाच्या मनात घर करून बसू शकता.. नव्या पिढीला दिशा देऊ शकता हे दाखविणारी त्यांच्या आयुष्याची गाथा.. मागील वर्षी त्यांच्या या कार्याची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले.
दक्षिण कर्नाटकातील अद्यानाडका हे गाव. या गावात महाबली भट यांच्याकडे २२ वर्षांचे असताना नाईक हे मजूरी करीत होते. भट यांच्याकडे नारळी व सुपारीच्या बागा होत्या. भट यांनी त्यांची शेतातील आवड व शेतीवरील त्यांचे अतोनात प्रेम पाहून त्यांना टेकडीवरील शेती दिली. त्या टेकडीवर पाण्याचा मागमूस नव्हता.
पण नाईक यांचे स्वप्न होते, त्या टेकडीला हिरवेगार करण्याचे.. तेथे नारळी, पोफळीच्या बागा साकारण्याचे.. मग नाईक यांनी हार मानली नाही. ते लढत राहीले.. सुरवातीला टेकडीच्या पायथ्याला झोपडी बांधली. मग पाणी साठविण्यासाठी आडवे बोगदे स्वतःच खोदायला सुरवात केली. एक नव्हे, दोन नव्हे सहा बोगदे खोदले.
दिवसा महाबली भटांकडे मजूरी करायची, संध्याकाळी झोपडीकडे परतल्यावर कामाला सुरवात करायची. पाच बोगदे खोदता खोदता ढासळले. मात्र नाईक थांबले नाहीत. मग सहावा बोगदा ३८ फूट खोल खोदला आणि मग मात्र पाणी लागले.
हे पाणी त्यांनी केळीच्या खोडाचा पाईपसारखा उपयोग करून घरापर्यंत आणले. या साऱ्या कष्टाचा प्रवास करायला त्यांना आठ वर्षे व २३ हजार तास लागले.. अर्थात हे नाईकांनी मोजले नाहीत. त्यांच्या कामाची दखल घेतली गेल्यानंतर या कामाचा आवाका लक्षात घेऊन कोण्या अभियंत्याने हे मोजले असेल.
पण आज त्याच नाईकांची शेती हिरवीगार आहे. ३०० सुपारीची, ८० नारळाची, १५० काजूची झाडे, तेवढीच केळीची झाडे त्यांच्या या शेतीत आहेत. त्यांच्या शेतात पाण्याच्या एका थेंबाचीही किंमत केली जाते. पाणी अजिबात वाया घालवले जात नाही.
शिक्षण, अधुनिक तंत्रज्ञान जोडीला नसतानाही या माणसाचे अचाट काम केले आहे. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.