शिरूर – महान्यूज लाईव्ह
बुधवारी व गुरुवारी वेगवेगळ्या विचित्र अपघातांमध्ये तब्बल ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. तालुक्यातील शिक्रापूर, जातेगाव फाटा व कोरेगाव भीमा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण मृत्यू पावले, या घटनांमध्ये जबाबदार असणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बुधवारी रात्री १० च्या सुमारास शिक्रापूरनजिक दोन विचित्र अपघात झाले. कोरेगाव भिमा येथील फडतरेवस्ती येथे राहणारा महेश राजाराम गव्हाणे हा २५ वर्षीय युवक दुचाकीवर अहमदनगर बाजूने निघाला असता, पाठीमागून एक कार (एमएच १२ एसवाय १९९०) भरधाव वेगाने आली आणि त्याने महेशला धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात महेशचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान महेश अपघातात गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्याला दवाखान्यात तातडीने हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
ती रुग्णवाहिका एकदम वेगाने जात असताना तिची दुचाकीला (एमएच१२ डिडब्ल्यू ६०७३) धडक बसली. या जोरदार धडकेत कोरेगाव भिमा येथीलच ढेरंगेवस्ती येथील श्रीकांत सूर्यकांत उबाळे या २६ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालकही जखमी झाला.
दरम्यान गुरूवारीही दोन अपघात झाले. शिक्रापूर पाबळ चौकातील रस्ता ओलांडणाऱ्या उध्दव सखाराम सातपुते या ३५ वर्षीय मूळच्या परभणीतील असलेल्या प्रवाशास अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यामध्ये सातपुते यांना जीव गमवावा लागला.
याच दिवशी रात्रीच्या वेळी शिक्रापूर चाकण रस्ता ओलांडणाऱ्या अजय भावसार या ३७ वर्षीय इसमास कारने धडक दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. तर याच दिवशी आणखी एका अपघातात करंदी फाटा येथील रहिवासी असलेल्या बाबूभाई शेख या २७ वर्षीय युवकास रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या तीन घटनांमध्ये रुग्णवाहिकेचा शिक्रापूर येथील जखमी चालक वैभव गजानन डोईफोडे, आदित्य हांडे (रा. चिंचोशी, ता. खेड), पुण्यातील वाहनचालक शंकर नरहरी राऊत याच्यासह अन्य दोन वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे फौजदार प्रमोद क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.