सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – निरा भिमा परिसरात गुंडगिरी फोफावत चालली आहे. वातावरण अतिशय गढूळ झाले आहे. काल 26 जानेवारी च्या संध्याकाळी चित्रपटातील फायटिंगसारखा प्रकार घडला. आमच्या गावात ट्रॅक्टरचा व्यवसाय का करतो? तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत नीरा भीमा कारखाना परिसरातील नऊ जणांनी दहशत माजवत ट्रॅक्टर मालकाला चौकात बोलावले व तलवार, सत्तूर, चैन च्या साह्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.
दरम्यान ते ९ जण मारत असताना वाचविण्यासाठी टाहो फोडणाऱ्या ट्रॅक्टरमालकाच्या मदतीला कोणीही धावून गेले नाही. उलट काहींनी आपली दुकाने बंद करून पोबारा केला. या हल्ल्यात ट्रॅक्टर मालक जीवन ज्ञानदेव जाधव ( वर ३३ रा. जाधववस्ती ,शेटफळ हवेली या. इंदापूर जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी जखमी जीवन ज्ञानदेव जाधव (वर ३३ जाधववस्ती ,शेटफळ हवेली या. इंदापूर जि.पुणे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून गौरव दत्तात्रय देवकर, रोहित उर्फ नन्या दत्तात्रय देवकर, अक्षय सुरेश देवकर (तिघेही रा. रेडा ता. इंदापूर जि. पुणे) व त्यांच्यासोबत असणारे सहा अनोळखी अशा नऊ जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ट्रॅक्टर चालक असून,मशागती करण्यासाठी आमच्या गावात यायचं नाही अशी धमकी वारंवार फिर्यादीला वरील आरोपींकडून दिली जात होती. दरम्यान या आरोपींनी फिर्यादीला गुरुवारी संबंधित ठिकाणी येण्याची, न आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दर गुरुवारी निरा भिमा कारखाना लगत आठवडा बाजार भरत असतो. यामध्ये रेडा, रेडणी, लाखेवाडी, काटी, शेटफळ हवेली, भोडणी या गावातील शेतकरी व मजूर लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. नेमका हाच बाजार चालू असताना हा हल्ला भर चौकात झाला. विशेष म्हणजे मारहाण होत असताना फिर्यादी जाधव यांनी जोरात मला वाचवा असे ओरडून मदतीसाठी याचना केली, मात्र मारहाण करणाऱ्यांच्या दहशतीमुळे सोडविण्यास कोणीही आले नसल्याचे म्हटले आहे.
तसेच वरिल इसमांच्या हातात असणारी हत्यारे पाहून त्या दहशतीला घाबरून चौकातील काही दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली तसेच त्यांच्यासह उपस्थित नागरिकांनीही तेथून पोबारा केला. या इसमांनी ट्रॅक्टरमालकास कुणीही दवाखान्यात नेणार नाही असे सांगत तेथून निघून गेले असे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान खुनी हल्ला झाल्याचे समजताच अवघ्या तासाभरातच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, व इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी फिर्यादी जीवन जाधव यांची उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतः माहिती घेतली. व त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही याचीही खात्री दिली व आरोपी पकडण्यासाठी त्वरित सूत्रे हलवली.