विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, ३ लाखांचा पुरस्कार..!
बारामती- महान्यूज लाईव्ह
येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरले आहे. विद्यापीठाने २०२२-२३ चा हा पुरस्कार जाहीर केला असून तीन लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १० फेब्रुवारीला विद्यापीठाच्या आवारात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
१० फेब्रुवारीला विद्यापीठाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. योगायोगाची बाब म्हणजे केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडूनही महाविद्यालयास तारांकित महाविद्यालयाचा (स्टार कॉलेज स्टेटस) दर्जा देण्यात आला आहे.
महाविद्यालयास स्वच्छतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. अटल रांकिंग मध्येही महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध करून देशात पहिल्या २५ महाविद्यालयात स्थान मिळवले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात हे मानाचे पुरस्कार समजले जातात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वर्धापनदिनानिमित्त गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पुरस्कारासाठी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार विद्यापीठाच्या समितीने जानेवारीत महाविद्यालयाची पाहणी केली.
विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केले होते. ग्रामीण विभागातून महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार नुकताच हजाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या तारांकीत महाविद्यालयासाठीही विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून तारांकीत महाविद्यालयाचे मानांकन मिळाले आहे. यातून महाविद्यालयातील प्राणिशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान या विभागांना १ कोटी ५५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते.
याच विभागाकडून डीएसटी फिस्ट योजनेतून महाविद्यालयास ७० लाखांचे अनुदान मिळाले होते. रूसा अंतर्गत महाविद्यालयास २ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. सन १९९४ मध्ये १५० विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या महाविद्यालयात आज ६ हजारांहून अधिक विद्यार्थी ११ वी पासून पीएचडी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात २१ पीएचडी मार्गदर्शक व ४० शिक्षक पीएचडीधारकांनी मागील तीन वर्षात १३८ शोधनिबंध प्रकाशित केले, त्यांना आठ पेटंट्सही मिळाले आहेत.
उपप्राचार्य डॉ शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, आयक्यूएसी समन्वयक प्रा. निलिमा पेंढारकर, प्रा.निलीमादेवी, डॉ जयश्री बागवडे डॉ. संजय खिलारे नितीन सावंत आणि समितीतील इतर सर्व सदस्यांनी सादर केलेला उत्कृष्ट प्रस्ताव व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे यश संपादन करता आल्याचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी सांगितले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाविद्यालयास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे, विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, विठ्ठलशेठ मनियार, बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांचे अभिनंदन केले.