शिरूर – महान्यूज लाईव्ह
तरुणाईचं रक्त सळसळतं असतं असं आपण नेहमीच म्हणतो.. मात्र आजकालची पोरं सळसळत्या रक्ताचा उपयोग स्वतःचीच घरं पेटविण्यासाठी करत असतील तर? शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे घडलेल्या या किश्श्यामुळे तर अनेकांची डोकी काम करेनात..
पिंपळे जगताप येथील प्रज्योत तांबे या युवकाने रागाच्या भरात थेट आपल्याच घराला आग लावली. कारला आग लावली.. आग धुमसू लागताच गावात धूम ठोकली.. अन निवांतपणे यात्रेतला तमाशा बघण्यास सुरवात केली. फक्त पोलिसांनी त्याला शोधून आणल्यावर त्याला आपण केलेल्या गैरकृत्याचे दिवसा तारे दिसले..
प्रज्योतचे आईवडील काही कामानिमित्त बाहेरगावी म्हणजे तालुक्यातील वाजेवाडी गावात गेले होते. मनात राग असलेल्या प्रज्योतच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. त्याने पहिल्यांदा एम एच १२ ए जी ९४१८ क्रमांकाच्या घरातील पार्क केलेल्या कारला आग लावली. मग घरात शिरून घरातील महागड्या वस्तूंना आग लावली.
जेव्हा बाहेरच्या कारमधील एसीच्या सिलेंडरचा स्फोट झाला, तेव्हा त्याने धूम ठोकली व तो गावात गेला. गावची यात्रा असल्याने गावात तमाशा सुरू होता.
जणू काहीच घडले नाही अशा अविर्भावात प्रज्योत गावच्या तमाशात जाऊन तमाशा एन्जॉय करीत होता. दरम्यान शेजारच्या लोकांनी घरातील आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरातील बहुतेक वस्तू जळून गेल्या होत्या.
मग लोकांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना दिली. त्यांच्यासह फौजदार
अमोल खटावकर, पोलीस हवालदार भरत कोळी, उद्धव भालेराव, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, कचरू वाजे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.
प्रकाश गायकवाड, कचरूनाना वाजे, वैभव दरेकर, प्रकाश वाजे, रवी वाजे, गजानन गायकवाड, काळूराम बोत्रे, संदीप जगताप यांसह आदींनी शेजारील पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली.
मग पोलिसांनी प्रज्योतला शोधण्यास सुरवात केली, अखेर प्रज्योत गावच्या तमाशात फौजदार अमोल खटावकर व पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांनी प्रज्योतला ताब्यात घेतले. तेव्हा प्रज्योतने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर आले.