दिल्ली – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही महिन्यांत एकापाठोपाठ एक आठवड्यात जगातील एक एक गर्भश्रीमंतांना पाठीमागे टाकत कधी दुसऱ्या तर कधी चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत बनलेल्या गौतम अदानींचा फक्त एका रिपोर्टने बाजार उठला. एका नकारात्मक अहवालाने गौतम अदानींच्या कंपन्यांमधील गुंतवणूक गुंतवणूकदारांनी सटासटा विकण्यास सुरवात केल्याने अवघ्या काही तासांत अदानींचे २.३७ लाख कोटींचे नुकसान झाले आणि अदानी चौथ्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर पोचले.
त्यांना एवढी ससेहोलपट करायला लावणारा हिंडेनबर्गच्या अहवालाचा विषय सोडा, त्याचा संस्थापक नाथन एंडरसन हा आहे तरी कोण? हे आधी जाणून घेऊ. एक टॅक्सीचालक असलेल्या नाथन एंडरसनने अख्ख्या जगात अजूनही कितीही झुंडशाही व पैशाची अमिषे असली तरी प्रामाणिकपणा विकला जात नाही हे दाखवून दिले आहे.
१०६ पाने.. दोन वर्षांचे संशोधन, ३२ हजार शब्द आणि ७२० पॉईंटचा शोधनिबंध हिंडेनबर्गने प्रसिध्द करून जागतिक बाजारात खळबळ माजवून दिली. दरम्यान या अहवालानंतर अदानी समूहाने हिंडेनबर्ग विरोधात आरपारची कायदेशीर लढाई लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मात्र तरीदेखील हिंडेनबर्ग संस्था आपल्या मुद्द्यांवर ठाम आहे.
कोण आहे नाथन एंडरसन?
सन २०१७ मध्ये नाथन एंडरसन यांनी हिंडेनबर्ग संस्था स्थापन केली. फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च करणारी ही संस्था मानवनिर्मित आपत्ती अथवा आर्थिक घोटाळ्यांची पडताळणी करते. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवस्थापनाची पदवी धारण केलेल्या नाथन याने इस्त्रायलमध्ये रुग्णवाहिका चालवली असल्याचे त्यानेच खुद्द सांगितले आहे.