बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील जळोची येथे स्थानिक नागरिकांशी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या संघटनांकडून सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाला लक्ष्य केले. त्यांनी यावेळी धर्मावर आधारीत राजकारणावर टिका केली.
त्या म्हणाल्या, आम्ही रामकृष्णहरी म्हणतो. हरिपाठात हरीचे नाव क्षणापुरते घेतले, तरी पुरेसे आहे असे सांगितले आहे. शिवाय आमचा विठोबा, पांडूरंग असा एकच देव आहे, जो सांगतो की, कामे करा, तुम्ही माझ्याकडे येण्याची गरज नाही, मीच तुमच्याकडे येतो.
मग असे असताना हे जनआक्रोश नावाने जे आंदोलन करताहेत, ते एकदम पांडूरंगांच्या, तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या विरोधात का वागताहेत? एक दिवस समाजासाठी द्या, तो आक्रोश करा, हा आक्रोश करा असे सांगत आहेत. एवढेच नाही, लग्न कोणी करायची हे ते ठरवू लागले आहेत.
त्यांच्या बॅनरवर तुम्ही जगायचे कसे, काय खायचे? समाजासाठी काय करायचे असे लिहीले आहे. हे तुम्ही कोण सांगणार? आम्ही रामकृष्णवाले, मनात दिवसभर राम ठेवतो, क्षणभर नाव घेतो आणि लोकांच्या सेवेत दिवसभर राहतो. म्हणून बारामतीचा विकास होतो.
आम्ही काय मेट्रोमोनीची जाहीरात करीत नाही. राष्ट्रीय पक्ष म्हणून रोटी, कपडा, मकान, खोलीकरण, रस्ता, सुरक्षेची जबाबदारी ही कामे आमची म्हणजे राजकीय पक्षांची असली पाहिजेत. कोणाच्या घरात ढवळाढवळ करायची हे काम नाही.
हेच करायचे असते, तर अजितदादांनी व मी एखादे हॉटेल टाकले असते किंवा मेट्रीमोनीची वेबसाईट काढली असती. या लोकांनी राजकारणाचा एवढा हलका विषय करून ठेवला आहे, नको ते विषय घेऊन त्यावर राजकारण करीत आहेत अशी टिका त्यांनी केली.
आता जर राष्ट्रवादीने लग्न कोणी कोणाशी करायची हे ठरवायचे ठरवले, तर लोक म्हणतील, अजित पवार, सुप्रिया सुळे तुम्ही रस्त्याच्या कामाचे पहा, ओढ्याच्या खोलीकरणाचे पहा, आमच्या पोरांची लग्न कोणाशी करायची, हे आम्ही पाहू. अगदीच
एखादा चांगला जावई सुचवला, तर पाहू म्हणतील. मात्र अगदी थेट तुमच्या घरात स्वयंपाक कोणता करायचा हे सांगितले तर चालेल का?