राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
मागील आठ दिवसांपासून दौंड आणि विशेषतः यवत पोलीस ठाणे राज्यभर चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. दौंडच्या भीमा नदीपात्रात तीन चिमुकल्यांसह ७ जणांचे मृतदेह आढळून आले आणि सारे वातावरण ढवळून निघाले, या घटनेने राज्यही हादरुन गेले.
मात्र या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या ५ आरोपींना अटक केले आणि ती कामगिरी केली यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने! पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व त्यांच्या टीमने आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पथकाने हा तपास सखोलपणे केला.
पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवालावर विश्वास न ठेवता आणि सुरुवातीस ही आत्महत्या असावी या संशयापासून कोणतेही ठोस पुरावे नसताना आत्महत्या आणि घातपात दोन्ही बाजूने आपल्या सूक्ष्म पोलीस नजरेने या घटनेकडे पाहत तपासाची सूत्र हलवली, गुन्ह्याचा छडा लावला.
खरंतर यवत पोलिसांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद तर आहेच, मात्र यामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता या घटनेचे गांभीर्य ओळखून अतिशय गोपनियता बाळगून शेवटी सात आरोपींना अटक करूनच थांबले. भीमा नदीच्या पात्रात अनेक मृतदेह पाण्याच्या प्रवाहाबरोबर सतत वाहून येत असतात. त्यामुळे अशा मृतदेहांकडे सहसा या नजरेने पाहत न बसता दुर्लक्ष केले जाते.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथे भीमा नदीच्या पात्रात १८ जानेवारीला एका अनोळखी महिलेचा पहिला मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०, २१ व २२ जानेवारी रोजी असे सलग तीन दिवस दोन पुरुष व एक महिलेचा मृतदेह आढळून आला. पाच दिवसात चार मृतदेह आढळून आल्याने आणि आणखी तीन लहान मुले ही या भीमा नदीच्या पात्रात बेपत्ता असल्याची माहिती समजताच पोलीस ही चक्रावून गेले.
चिमुकल्यांचा शोध घेण्यासाठी पाणबुडी पथके, आपत्कालीन व्यवस्थापन पथके शोध मोहीमेसाठी तैनात करण्यात आली आणि २४ जानेवारीला तीन चिमुकल्यांचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात शोधण्यास या पथकाला यश आले.
अर्थात पहिला मृतदेह आढळून आल्यापासून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे या घटनेकडे बारीक लक्ष ठेवून होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली. तर बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे मागील आठ दिवसांपासून यवत पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. तेही या घटनेकडे लक्ष्य ठेवून पोलीस तपास पथकांना मार्गदर्शन करत होते.
यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि ही आत्महत्या आणि घातपात या दोन्ही बाजूने तपासाला सुरुवात केली होती. त्याच अनुषंगाने यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पद्माकर गंपले, पोलीस हवालदार निलेश कदम महेंद्र चांदणे ,रामदास जगताप अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड, विकास कापरे
विशाल जाधव आदी पोलीस पथकाच्या टीमने याच्या सर्व बाजूंनी तपास सुरू केला.
मृतदेहांपैकी एका महिलेजवळ एक मोबाईल फोन सापडला आणि या मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाली, शिवाय सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे अतिशय भयानक व माणुसकी हिरावून घेणारे, मनसुन्न करणारे दौंड तालुकाच नव्हे तर राज्य हादरुन सोडणारे तीन चिमुकलांसह सात जणांचे हत्याकांड झाल्याचे यवत पोलिसांनी आपल्या तपासात समोर आणले.
२४ जानेवारी रोजी तीन चिमुकल्यांचा मृतदेह सापडला आणि अवघ्या २४ तासाच्या आतच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केले. यामध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननवरे साहेब फौजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार सचिन घाडगे राजू मोमीन आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव या ५ जणांना अटक केली आहे. या सर्वांनी अशोक कल्याण पवारचा मुलगा धनंजय याच्या अपघाती निधनाचा राग मनात धरून नियोजनबध्दरित्या चार जणांचा खून केला. तर तीन लहान मुलांना क्रूरपणे नदीत फेकून दिल्याची कबुली दिली.
दरम्यान, पहिला मृतदेह आढळल्यापासुन सातत्याने वेगवेगळी कारणे पुढे येत होती सुरवातीला ही आत्महत्या वाटली, नंतर करणी व अंधश्रध्देतून हा प्रकार घडल्याची चर्चा नातेवाईक करीत असल्याने हे प्रकरण वेगळेच वळण घेते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, मात्र पोलिसांनी आपल्या तपासाचा अँगल मात्र जराही बदलला नाही आणि पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी यवत पोलीस ठाण्यात बुधवारी ( दि २५) पत्रकार परीषद घेऊन या घटनेची इत्थंभूत माहिती दिली.
मात्र मागील आठ-दहा दिवसांपासून दौंडचे भीमा नदीचे पात्र सात जणांच्या भीषण हत्याकांडाने चर्चेत आले. यवत पोलिसांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दाखवलेले तात्पर्य, घटनेचे गांभीर्य, चाणक्य बुद्धी, पोलिसी नजर प्रत्येक बाबींवर संशय आणि तपासातील बारकावे आणि त्यातच बाळगलेली या कानाची त्या कानाला खबर लागणार नाही अशी गोपनियता.
सगळ्यात महत्त्वाचे पोलीसांनी रात्रीचा दिवस करीत घेतलेले कष्ट अतिशय कौतुकास्पद होते. पोलीस खात्याची मान उंचवणारी कामगिरी पोलिसांनी केली. त्यामुळे पुणे जिल्ह्यात येत नव्हे तर राज्यभरात यवत पोलिसांचे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कौतुक केले जात आहे.