राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंडच्या भीमा नदीपात्रात तीन चिमुकल्यांसह ७ जणांचा खून झाला. या घटनेने सारे वातावरण ढवळून निघाले आहे, ५ जणांना यामध्ये अटक केली असून ही पाचही सख्खी भावंडे आहेत. त्यामध्ये ४ सख्खे भाऊ व त्यांचीच एक बहिण आहे.
अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव या ५ जणांना अटक केली आहे. या सर्वांनी अशोक कल्याण पवारचा मुलगा धनंजय याच्या अपघाती निधनाचा राग मनात धरून नियोजनबध्दरित्या चार जणांचा खून केला. तर तीन लहान मुलांना क्रूरपणे नदीत फेकून देण्यात आल्याचेही आता उघड झाले आहे.
धक्कादायक बाब अशी की, सातत्याने वेगवेगळी कारणे पुढे येत असलेल्या या घटनेत करणी व अंधश्रध्देतून हा प्रकार घडल्याची चर्चा नातेवाईक करीत असून पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी मात्र अशा प्रकारची कोणतीही गोष्ट आतातरी आमच्यासमोर आलेली नाही असे स्पष्ट केले. आज दुपारी पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परीषद घेऊन या घटनेची इत्थंभूत माहिती दिली आणि पत्रकार परीषदेतील पत्रकारांच्याही अंगावर काटा आला.
आढळलेल्या सात मृतदेहांबाबत आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. १८ जानेवारीपासून नदीत एकापाठोपाठ मृतदेह आढळत गेले. लहान मुलेही मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांच्या शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आल्याने सुरवातीला हा प्रकार आत्महत्येचा वाटला. त्यातच मृत मोहन पवार यांच्या मुलाने यासंदर्भातील माहिती दिल्याने ही आत्महत्या असण्याचा अंदाज अधिक गडद झाला होता.
मात्र त्याचवेळी मुलाने विवाहित मुलीला पळवून नेले किंवा तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले, म्हणून शल्य मनात ठेवणारे मोहन पवार, संगीता यांची आत्महत्या होईल, मात्र त्यांची मुलगी राणी व जावई शाम आणि त्यांचेही कुटुंब आत्महत्या कसे करेल या प्रश्नाने सारेच अस्वस्थ झाले होते. आणि या तपासादरम्यान पोलिसांनाही काही संशयास्पद बाबी आढळून आल्या.
पोलिसांनी आपली सूक्ष्म नजर सोडली नाही.. पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी या सूक्ष्म व बारकाव्यांचा तपास केला.
पवार कुटुंब १७ जानेवारी रोजी रात्रीच ठोकलेली पाले उचकटून येथून निघून गेले अशी माहिती देणारे त्यांचेच नातेवाईक पारगावच्या आसपास १८ जानेवारीच्या पहाटेपर्यंत फिरकत होते. कारण तांत्रिक बाबींनुसार त्यांचा संपर्क याच ठिकाणी होता. अर्थात जर त्यांना पवार कुटुंब कोठे गेले हे माहिती नव्हते, तर ते येथे काय करीत होते हा प्रश्न चाणाक्ष पोलिसांनी हेरला आणि येथेच तपासाची नवी दिशा ठरली.
आरोपी पळून जाऊ नयेत, तसेच यातील खरा प्रकार समोर यावा यासाठी पोलिसांनी गुप्तता पाळली आणि आज पहाटे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक केली, तर दुपारी एक वाजता यातील फरार महिलेलाही अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले.
मूळच्या बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील, परंतू उदरनिर्वाहासाठी नगरच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहणाऱ्या मोहन पवार व त्याच्या कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भिमानदीपात्रात आढळून आल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील सारेच धागेदोरे पोलिसांनी सहा दिवसांत उघडकीस आणल्यानंतर महाराष्ट्र आणखीच सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
या घटनेत मोहन उत्तम पवार ( वय ४८), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८), रितेश उर्फ भैय्या शाम फुलवरे (वय ७), छोटू शाम फुलवरे (वय५ वर्षे), कृष्णा शाम फुलवरे (वय ३ वर्षे) या सात जणांचे हत्याकांड झाले.
मोहन पवार यांचा पुण्यातील मुलगा राहूल याच्या सांगण्यानुसार मुलाने पळवून नेलेल्या विवाहित मुलीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी तपास सोडला नाही आणि त्यातून आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले.
ते म्हणजे मोहन पवार यांचा मुलगा अमोल हा चुलतभाऊ अशोक पवार यांचा मुलगा धनंजय याच्याबरोबर पुण्यात गेला होता. तिथे अपघात झाला आणि धनंजय गंभीर जखमी झाला. त्याला तिथेच सोडून अमोल घरी आला. चार दिवसांनी पुण्यात या अपघातग्रस्त मुलाचा मृत्यू झाला. अमोल त्याच्यासोबत असल्याचे सीसीटिव्हीतून लक्षात आल्याने अमोलनेच घातपात केला असावा असा संशय मोहन पवार यांच्या चुलतभावांमध्ये बळावला.
अमोल यानेच आपल्या मुलाचा अपघात घडवून आणल्याचा संशय शाम व प्रकाश पवार या मोहन पवारांच्या चुलतभावांना आला. त्यातून खूनाचा कट रचला गेला.
अतिशय थंड डोक्याने केलेल्या दोन कुटुंबांच्या या खूनाने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेत दोन कुटुंबे कायमची संपली, तर आता ज्यांनी हा खून केला, ती कुटुंबेही उध्वस्त होतील. एखाद्यावरचा राग त्याच्यापुरता सिमीत न राहता अगदी त्यांचे वंश देखील खुडण्यापर्यंत जात असेल, तर दुर्दैव आहे.
अंधश्रध्देचा प्रकार सध्यातरी पुढे आलेला नाही- गोयल
दरम्यान पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परीषदेत बोलतातना कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती दिली. दरम्यान हा अंधश्रध्देचा प्रकार आहे की नाही हे आताच्या तपासात उघड झालेले नाही. आरोपींच्या पोलिस कोठडीतून हे उघड होईल. आणखीही आरोपी असू शकतात. चार भाऊ व एक बहिणीला आतापर्यंत अटक केलेली आहे असे गोयल यांनी सांगितले.