राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंडच्या भीमा नदीपात्रात आढळलेल्या सात मृतदेहांबाबत आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतरही पोलिसांनी आपली सूक्ष्म नजर सोडली नाही.. पुणे पोलिसांच्या या सूक्ष्म व बारकाव्यांच्या तपासातील नजरेतून काहीच सुटले नाही.. या ७ ही जणांच्या शवविच्छेदनात खूनाचा प्रकार समोर आला नसला, तरी शेवटच्या क्षणापर्यंत पोलिसांनी मात्र घातपाताच्या दिशेनेही या घटनेचा तपास केला आणि हा नियोजनबध्द खून असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली असून यातील एक महिला फरार आहे.
मूळच्या बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील परंतू उदरनिर्वाहासाठी नगरच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहणाऱ्या मोहन पवार व त्याच्या कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भिमानदीपात्रात आढळून आल्याने राज्यभर खळबळ उडाली होती.
या घटनेत मोहन उत्तम पवार ( वय ४८), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८), रितेश उर्फ भैय्या शाम फुलवरे (वय ७), छोटू शाम फुलवरे (वय५ वर्षे), कृष्णा शाम फुलवरे (वय ३ वर्षे) या सात जणांचा मृतदेह आढळून आला.
मोहन पवार यांचा पुण्यातील मुलगा राहूल याच्या सांगण्यानुसार मुलाने पळवून नेलेल्या विवाहित मुलीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी तपास सोडला नाही आणि त्यातून आणखी एक धक्कादायक सत्य समोर आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
अर्थात पोलिसांनी अद्याप याची माहिती दिलेली नाही, मात्र निघोज येथून गेलेले पवार कुटुंबिय कोणालाच माहिती नव्हते अशी माहिती सुरवातीला देणाऱ्या पवार याच्या नातेवाईकांचीही पारगाव परिसरात १७ जानेवारीच्या दरम्यान उपस्थिती होती, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावत गेला.
शिरूर- हवेली तालुक्यातील एका अपघाताच्या घटनेनंतर अमोल यानेच आपल्या मुलाचा अपघात घडवून आणल्याचा संशय असल्याच्या कारणावरून निघोज येथीलच मोहन पवार याच्या नातेवाईकांनी या खूनाचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यातून पोलिस खूनाच्या संशयापर्यंत पोचले आणि त्यातून दोघांना ताब्यात घेतले आणि रात्री त्यांनी या खूनाची कबुली दिली.
अतिशय थंड डोक्याने करण्यात आलेल्या दोन कुटुंबांच्या या खूनाचे नेमके कारण काय आणि त्यामध्ये संपूर्ण दोन कुटुंबे त्यांचे वंश देखील खुडण्याचे नेमके कारण काय याचा उलगडा आता पोलिसांकडूनच होईल. मात्र आत्महत्येचा प्रवास खूनापर्यंत पोचल्यानंतर आता या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.