सातारा – महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रात तरुणाईने हैदोस घातल्याशिवाय जिचा लावणी कम अश्लिल हावभावांचा कार्यक्रमच होत नाही, त्या गौतमी पाटीलवर सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गौतमी पाटील हिच्यावर खरोखरच कारवाई होणार का? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांनाही आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हिच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच तिच्या कार्यक्रमांतून राडा हे समीकरणच बनले आहे. राज्यातील इतर लावणी कलाकारांनी देखील गौतमी हिच्या नृत्याबाबत आक्षेप घेऊन लावणीला बदनाम करत असल्याचा ठपका गौतमी हिच्यावर ठेवला आहे.
त्यातच आता सातारा न्यायालयात प्रतिभा शेलार यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने गौतमी हिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या गौतमी हिच्या नृत्यातील काही स्टेपवरून नाराजीही आहे. त्यातच सांगली जिल्ह्यात एका प्रेक्षकाचा तिच्या कार्यक्रमादरम्यान मृत्यूही झाल्याची घटना घडली. प्रचंड गर्दीमुळे ती घटना घडली होती. त्यानंतर गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी मागणी पुढे आली होती.