बारामतीत ४०८ रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी..! यापुढे या शस्त्रक्रिया वाढविण्याचा यंदाच्या शिबीरातून सुनेत्रा पवारांनी केला संकल्प
बारामती – महान्यूज लाईव्ह
एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेने बारामतीत सौ. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या मोतिबिंदू शिबीरात तब्बल ४०८ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा हा बारामतीतील रुग्णसेवेचा यज्ञ अखंडपणे तेवत ठेवल्याने पवार कुटुंबिय व नेत्रतज्ज्ञांमुळे ४०८ जणांना पुन्हा अगदी सहजपणे हे जग स्पष्टपणे पाहण्याची संधी मिळाली आहे.

बारामतीत जे सामाजिक काम सुरू असते, त्याचा फारसा गाजावाजा केला जात नाही, ते काम अव्याहतपणे सुरू असते.. ते कोणत्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केले जात नाही, ती सामाजिक सदभावना म्हणून घेतलेले व्रत असते.. एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने बारामतीतही असेच काम अखंड सुरू आहे.

त्याचाच धागा पकडून सौ. सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून बारामतीत नियमितपणे सुरू असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा पुढील टप्पा हा अधिकाधिक रुग्णसंख्येचा असेल असे सुतोवाच केले आहे. हाच संकल्प घेऊन यावर्षीच्या शिबीराची सांगता झाली.
ज्येष्ठ नागरिकांमधील मोतीबिंदूच्या अधिकाधिक शस्त्रक्रिया करुन त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया भविष्यात अधिक व्यापक काम करणार असल्याची माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या वतीने बारामतीत आयोजित मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर झाले. या शिबीरातील सहभागी रुग्णांवर शस्त्रक्रियानंतर करावयाच्या सर्व तपासण्या, चष्मेवाटप व उपचार मोफत केले जातात.
ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. प्रकाश रोकडे, डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
शुक्रवारी (ता. 20) व शनिवारी (ता. 21) अशा दोन दिवशी डॉ. लहाने व डॉ. पारेख यांनी 408 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. या सर्व रुग्णांना डॉ. लहाने यांनी सूचना दिल्या. यावर्षीच्या मोतीबिंदू शिबीराच्या निमित्ताने दाखल झालेल्या 65 रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अतिरिक्त असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता आली नसल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.
दरम्यान आगामी काळात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरांची संख्या वाढवून राज्यभरातील अधिकाधिक गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळण्यासाठी आम्ही व्यापक काम करणार असल्याचे सौ. पवार यांनी सांगितले.
दरम्यान या शिबीरासाठी अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केल्याने हे शिबीर यशस्वी करु शकल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मोतीबिंदू निवारणाचे सुनेत्रावहिनींनी घेतलेले व्रत व डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांची त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आम्ही शस्त्रक्रियेसाठी या शिबीरात आल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.