राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातुन गेलेल्या भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपूर्वी आढळून आलेल्या चार मृतदेहांची ओळख पटलेली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत. ते पिकअप जीप, छोटा हत्ती किंवा इतर कोणत्यातरी वाहनाने प्रवास करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे.
मोहन उत्तम पवार ( वय ४८), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) अशी सापडलेल्या मृतदेहाची नावे असुन त्यांच्या सोबत चार वर्षाच्या आतील ३ लहान मुले आहेत. (सर्व रा. निघोज ता. पारनेर जि.नगर ) हे माती वडार समाजातील भटकंती करणारे हे कुटुंब आहे.
मंगळवारी (दि १७) हे सर्व रात्री अकरा वाजण्याच्या नंतर कोणत्यातरी पिकअप जीप, छोटा हत्ती अशा किंवा इतर वाहनाने राहाण्यासाठीचे सामान पाल ठोकुन राहाण्याचे साहीत्यासह घेऊन निघोज या गावातून निघुन गेले. अशी माहिती पारनेर पोलीसांनी दिली आहे.
शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृत्यदेह आढळून आले होते. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. १८ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर २०,२१ व २२ जानेवारी रोजी तीन मृतदेह टप्पा टप्प्याने आढळून आले होते. भीमा नदीच्या पात्रात मागील पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आल्याने यवत पोलीस सतर्क झाले आहेत. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या तीन लहान मुलांचा अद्याप ही शोध लागला नाही.
दरम्यान, ही आत्महत्या आहे की अपघात आहे की घातपात. याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र सोमवारी (दि २३) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीम साठी तैनात केली आहेत. या घटनेबाबत यवत पोलीस सखोल तपास करीत आहेत.
दरम्यान, पारनेर तालुक्यातील या कुटुंबातील व्यक्तींना पिकअप, छोटा हत्ती किंवा इतर वाहनाने त्यांना प्रवास करण्यासाठी घेतले होते का? लिप्ट दिली होती काय? त्यांना कोणी पाहीले होते काय ? किंवा याबाबत काही माहीती असल्यास यवत व पारनेर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यवत पोलीस निरीक्षक 9923600017, यवत पोलीस उपनिरीक्षक 9404969005, पोलीस निरीक्षक पारनेर- 9552530527, पोलीस उपनिरीक्षक पारनेर- 9922932230