दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील भिमनगरच्या नवयुग प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याठिकाणी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरवला होता, या बाजारात चिमुकल्यांनी आणलेल्या भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करण्यात आल्याने या चिमुकल्याचा चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या हस्ते या आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार शरद भोंग, दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक तुकाराम राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभाग दौंड तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, बाळासाहेब वागस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक संदीप मांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, शाळेतील सहशालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून बहुतेक शाळांमध्ये एक दिवस आठवडे बाजार भरवून हा बाल आनंद मेळावा साजरा केला जातो. यानिमित्ताने मुलांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती मिळते.
गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी मुलांना आठवडे बाजारात मुलांनी आणलेला भाजीपाला, फळभाज्या, खाऊचे पदार्थ व इतर वस्तू विक्री करून त्यात नफा मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या व्यवहारातून मुलांनी नफा तोट्याचे आर्थिक गणित समजून घ्यावे असा संदेश देखील दिला.
विद्यार्थ्यांच्या पालकांनी व परिसरातील नागरिकांनी या आठवडे बाजारातून मुलांकडून वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला खरेदी केला. मुलांनी आपापल्या घरून काही पदार्थ देखील बनवून या आठवडे बाजारात विक्रीसाठी ठेवले होते ते बघता बघता हातोहात सर्व पदार्थ विकले गेले. त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
संतोष गवळी, अशोक गिरमकर पंकज सोनवणे, रूपाली निडोणी, प्रगती भंगाळे, लता चितळे, निलेश बावधनकर आदींनी याचे नियोजन केले.