पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी केली पाहणी!
राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील भीमा नदीपात्रात पारगाव हद्दीत गेल्या पाच दिवसात टप्प्या-टप्प्याने चार मृतदेह आढळून आले आहेत. आणखी तीन लहान मुले बेपत्ता आहेत. ही आत्महत्या आहे की अपघात आहे की घातपात? या घटनेची यवत पोलीस कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज भीमा नदी पात्रात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
१८ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०,२१ व २२ जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले. भीमा नदीच्या पात्रात मागील पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आल्याने यवत पोलीस सतर्क झाले आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली असून हे मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी यवत पोलीस ठाण्यात आक्रोश केला.
या कुटुंबातील आणखी तीन लहान मुले बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली.
याप्रसंगी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे उपस्थित होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली आहेत. या घटनेबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.