सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
मित्र कितीही जीवाभावाचा असला तरी त्याची नियत कशी आहे, त्याचे सामाजिक वर्तन कसे आहे, त्यावर त्याची घरापर्यंतची मैत्री ठेवा.. अन्यथा बावड्यासारखी गत व्हायची.. बावड्यात शाळकरी मित्राने घात केला.. मित्राच्याच बायकोशी अनैतिक संबंध ठेवले आणि अखेर नवऱ्याला आत्महत्या करावी लागली..!
बावड्यात पती, पत्नी और वो चा सेगमेंट असा पार पडलाय की, त्यात पतीला जीव गमवावा लागला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध व त्यातून मित्र आणि पत्नी मारहाण करीत असल्याने व्यसनाधिन झालेल्या जावेद मुलाणी याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
बावड्यातील या घटनेप्रकरणी पत्नी काजल मुलाणी व तिचा प्रियकर प्रविण उर्फ बाबा तानाजी सावंत या दोघांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुस्तफा जिलाणी मुलाणी (रा. बावडा, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली होती. यातील जावेद याचा सन २०१७ मध्ये काजल मुलाणी हिच्याशी विवाह झाला होता. तर प्रविण सावंत व जावेद हे दोघे शाळकरी मित्र होते.
मुस्तफा मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मित्र व पैशाचे व्यवहार यामुळे प्रविण हा जावेदच्या घरी अनेकदा जात-येत होता. त्यातून काजल हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध जुळले आणि याची माहिती झालेल्या जावेदला हा ताण सहन झाला नाही, त्याचे पत्नीबरोबर खटके उडू लागले. त्यानंतर जावेद हा व्यसनाच्या आहारी गेला.
मात्र त्यानंतर झाले भलतेच, जावेदला पत्नी काजल व प्रविण या दोघांनी त्याला मारण्यास सुरवात केली. २० जानेवारी रोजी स्वतःच्याच घरात काजल व प्रविण या दोघांना एकत्र पाहून जावेदने जाब विचारला, त्यावरून प्रविण याने त्याला शिवीगाळ व मारहाण केली. या तणावात जावेदने घराच्या पत्र्याच्या लोखंडी चॅनेलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर जावेदचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी मृतदेह घेऊन पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठोस गुन्हा दाखल करीत नाहीत, तोवर मृतदेह नेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांनी त्यांची समजूत घालत या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी आरोपींची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. याचा पुढील तपास सहायक निरीक्षक एन.जी. पाटील करीत आहेत.