सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूरला जोडणारा डिक्सळ येथील ब्रिटिशकालीन पुल गेले आठ दिवस झाले वाहतुकीसाठी बंद केला आहे, त्यामुळे शाळेतील मुले तसेच करमाळा तालुक्यातून येणारी सर्व लोकांचे खूप हाल होत आहेत.
हॉस्पिटल तसेच बारामती भिगवण येथील महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. त्याचा परिणाम भिगवण बाजारपेठेवरही झाला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन रविवारी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुलाची पाहणी केली व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून या पुलाची तातडीने दुरुस्ती करून तो पूल सर्वांसाठी खुला करावा अशी सूचना केली.
या नवीन पुलासाठी राज्य शासनाने ५० कोटी मंजूर केले असल्याची माहिती भरणे यांनी दिली. मात्र या कामासाठी आणखी दीड ते दोन वर्ष एवढा कालावधी जाणार आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, त्यासाठी लवकरात लवकर दुरुस्ती करून लोकांसाठी हा रस्ता खुला करावा अशी सूचना भरणे यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी भिगवण, डिक्सळ भागातील ग्रामस्थांसह करमाळा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.