दौंड, महान्युज लाईव्ह
दौंड पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत दौंड पोलिसांच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषण तिसऱ्या दिवशी उपयोगी पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या अर्ध्या तासाच्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलकांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.
दरम्यान , सोमवारी (दि २३) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासोबत आंदोलकांची चर्चा होणार असून त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली. दौंड पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरी संघटनेच्या २६ पदाधिकार्यांवर बेकायदा जमाव जमवणे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दौंड पोलिसांनी जातीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत याच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व भिमसैनिकांनी गुरुवारी (दि.२०) पासून आमरण उपोषण सुरू केले होते. मागील दोन दिवसापासून हे उपोषण सुरू असल्याने आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते.
या आंदोलनाबाबत विविध संघटनांच्या पदाधिकऱ्यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या शी संपर्क साधला होता. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते ऍड आनंदराज आंबेडकर, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते जयदीप कवाडे आदींनी आंदोलनकर्त्यांशी व्हिडिओ कॉल वर संपर्क करत माहिती घेतली होती.
तसेच भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव ऍड राहुल मखरे, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन विचारपूस करीत पाठींबा दिला होता. दरम्यान रविवारी दौंड उपयोगी पोलीस अधिकारी राहुल धस यांनी उपोषणकर्त्यांची अर्ध्या तास चर्चा केली.
काही मागण्या माझ्या अखत्यारीत येत नसून त्या मुख्यमंत्री व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे येत असल्याने त्यावर त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. असे उपविभागीय पोलीस अधिकारी धस यांनी सांगितले. त्यांच्याशी चर्चेनंतर व धस यांच्या हस्ते ज्यूस देऊन उपोषण स्थगित केले. मात्र उपोषण स्थगित जरी केले असले, तरीही आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू असे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.