जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात विज्ञान प्रदर्शनाची जोरदार तयारी..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती इंदापूर व जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलमध्ये सोमवारी (दि. 23जानेवारी) 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी दिली.
हे विज्ञान प्रदर्शन सोमवारी सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजय कुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, माजी गटशिक्षणाधिकारी प्रदीप गुरव हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विज्ञान प्रदर्शनात इंदापूर तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध शाळांमधील जवळपास सव्वा दोनशे वैज्ञानिक प्रकल्प विद्यार्थी सादर करतील. यासाठी संकुलाच्या मैदानावर प्रदर्शनाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी दिली. प्रदर्शनात कसलीही कमतरता भासणार नाही असे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, जनसंपर्क अधिकारी गणेश पवार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर आदी प्रयत्न करत आहेत.