शिरूर : महान्यूज लाईव्ह
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात ॲड. निकिता प्रताप काकडे यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) या पदावर निवड झाली आहे.
राज्य लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत ॲड.निकिता यांनी घवघवीत यश मिळवत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ट स्तर) या पदावर नाव कोरले. त्यांच्या या यशाबद्दल मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड. निकिता काकडे यांनी सांगितले की, सात वर्षांच्या असताना वडिलांचे निधन झाले. वडील मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर कौटुंबिक जबाबदारी आईवर पडली. मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांनाही आईने शिक्षणापासून वंचित न ठेवता दोघांनाही शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले.
अशी भावना अॅड निकिता काकडे यांनी व्यक्त केली. तसेच आई स्नेहल काकडे यांनी सांगितले कि, दहावी पर्यंतचे निकिता यांचे शिक्षण पुण्यातील अहिल्यादेवी विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी बारावीचे शिक्षण नूतन मराठी विद्यालयामध्ये घेतले तसेच पुढील विधीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पूर्ण केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना अॅड गणेश शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड.निकिता या मांडवगण फराटा गावचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय फराटे इनामदार यांच्या त्या भाची आहेत.
या सत्कार प्रसंगी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे ,पोलीस पाटील बाबा पाटील फराटे ,कृष्णराव फराटे ,धनंजय फराटे , मच्छिंद्र जाधव ,राजेंद्र फराटे, रामभाऊ चव्हाण आदी उपस्थित होते.