सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात बेलवाडी गावात काही दिवसांपूर्वीच सत्तांतर झाले आणि भाजपच्या तालुकाध्यक्षांनी बाजी मारली. मात्र याला महिनाही उलटत नाही, तोच गावातील राजकारण रंगले आहे. राष्ट्रवादीने या गावात मंजूर केलेल्या विकासकामांची भूमीपूजने व उदघाटन करण्याचा निर्णय जाहीर करताच भाजपने त्यावर कडी केली आणि भाजपनेही त्याच कामांचे भूमीपूजन, उदघाटन करण्याचा घाट घातला आहे.

आज (रविवारी) संध्याकाळी इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते गावातील विविध मंजूर विकासकामांची भूमीपूजन व उदघाटने होणार आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या मैदानासमोर याची जाहीर सभाही होणार आहे.
भरणे यांनी मंजूर केलेल्या व मंजूरीनंतर उभारलेल्या विकासकामांची ही भूमीपूजन व उदघाटने केली जाणार असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. शुभम निंबाळकर व मयूर जामदार यांनी यासंदर्भात कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीने हा कार्यक्रम आयोजित करताच भाजपनेही लागलीच याच कार्यक्रमांची भूमीपूजने व उदघाटने करण्याचे ठरवले. भाजपनेही कार्यक्रमाची यादी करून तशी माहिती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिली आहे. सरपंच मयुरी जामदार यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन भाजपने केले आहे.
अर्थात आता या गावात राष्ट्रवादीची सत्ता नाही, म्हणजे सरपंच राष्ट्रवादीचा नाही, मात्र ही विकासकामे यापूर्वीचीच मंजूर आहेत असे सांगत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या या कृतीचे आश्चर्य व्यक्त केले आहे.
हर्षवर्धन पाटील आता जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य बनले आहेत, त्यामुळे यापुढील काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीवर दत्तात्रेय भरणे संध्याकाळी काय बोलणार याची उत्सुकता आहे.