बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषिक या शेतीविषयक प्रदर्शनात सन २०१५ पासून आजवर झालेल्या गर्दीचे उच्चांक काल (शनिवारी) राज्यभरातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी मोडले.
काल सकाळपासूनच शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्राकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांमुळे बारामती -निरा हा रस्ता बराच वेळ वाहतूक कोंडीमुळे जाम झाला होता.
पोलिसांना ही वाहतूक सुरळीत करण्यास दोन तास लागले. वाहनांच्या संख्येमुळे त्यांच्या पार्किंगचे नियोजन करणाऱ्या यंत्रणेवरही ताण आला होता. तर दुसरीकडे ही गर्दी पाहून अनेक शेतकऱ्यांनी त्यांची वाहने शारदानगरमध्ये पार्कींग करून पायी प्रदर्शन स्थळाकडे जाणे पसंत केले.
बारामतीतील कृषिक प्रदर्शनात १७० एकरावर यावर्षी पिकांची जिवंत प्रात्यक्षिके उभारण्यात आली असून जगभरातील नव्याने प्रसारीत केलेल्या वाणांची प्रत्यक्ष लागवड, किटकनाशक अथवा पोषक जिवाणूतत्वांची प्रत्यक्ष फवारणी करून येणारे परिणाम दाखविण्याचा प्रयत्न विविध बियाणे, किटकनाशक कंपन्यांनी केली आहेत.
ते पाहून शेतकऱ्यांनी आपले मत ठरवावे व उद्याची शेती करण्याचा मूलमंत्र येथून घेऊन जावा अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे. भविष्यात होणारी कृत्रिम बुध्दीमत्तेची शेती व त्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयोग, त्यांचे आलेले दृश्य परिणाम याची माहिती देखील शेतकरी या प्रदर्शनात घेत आहेत.
२३ जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.