दौंड : महान्यूज लाईव्ह
संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरी संघटनेच्या २६ पदाधिकार्यांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व भिमसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुरुवारी ( दि १९) दौंड पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे व बेकादेशीर जमाव जमवणे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
मात्र दौंड पोलिसांनी जातीय द्वेषातून हे गुन्हे दाखल केला असल्याचा आरोप करीत गुरुवारी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या कार्यासमोर निदर्शने करण्यात आली.तर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व फिर्यादी महेंद्र गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी शुक्रवारी (दि.२०) आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरील संविधान चौकात अमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबतचे निवेदन दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना देण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अमित सोनवणे, ऑल इंडिया दलित पँथरचे सागर उबाळे, प्रतीक बनसोडे , पप्पू बनसोडे,आदिंसह भीमसैनिकांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास शहरातील मुस्लिम समाजातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते उत्तमराव गायकवाड, दलित संघटनेचे ज्येष्ठ नेते आबासाहेब वाघमारे, नागसेन धेंडे, भारत सरोदे, नरेश डाळिंबे आदींनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या कार्यकमाचे आयोजन करणाऱ्या संबंधित कार्यकर्त्यांवरही दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, संभाजी भिडे हे दौंड शहरात आलेच नाहीत आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण झाला नाही तरीही दौंड पोलिसांकडून गुन्हे का दाखल करण्यात आले आहेत ? गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव आला? असा प्रश्न आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील म्हणाले की, संभाजी भिडे हे दौंड शहरात येणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवू नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक व विरोधक यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनीही संभाजी भिडे येणार नाहीत तसेच जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे, त्यामुळे कोणीही आंदोलन करू नये शांतता राखावी अशी समज दोन्ही गटांना यावेळी दिली होती. मात्र दोन्ही गटांकडून बेकायदेशीर जमाव जमवुन घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मागे कोणताही जातीय द्वेष नसल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.