विक्रम वरे -महान्यूज लाईव्ह
बारामती व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थीही जगाच्या तोडीस तोड झाला पाहिजे, ही धारणा मनात ठेवून बारामतीला शैक्षणिक हब बनविण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत राहीलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून आता बारामतीत काळाची पावले ओळखून जगाशी स्पर्धा करणारे तरुण घडविण्याची तयारी सुरू आहे.
त्याकरीताच भविष्यात जी काळाची गरज ठरणार आहे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक अत्याधुनिक केंद्राची स्थापना केली जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमाची सुरुवात शरद पवार यांच्या हस्ते २३ जानेवारी २०२३ रोजी विद्या प्रतिष्ठान संकुलातून होणार आहे. दरम्यान या कृत्रिम बुध्दीमत्तेसाठी विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये ३५ कोटी रुपये खर्चून एक अत्याधुनिक इमारत तयार केली जाणार आहे.
यात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येईल. यामध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरीटी, वास्तव व आभासी प्रतिमांचे एआरव्हीआर, डेटा सायन्स, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स), मशीन लर्निंग या विषयांवर अभ्यासक्रम शिकविले जातील.
यामध्ये प्रत्येकी सहा महिन्यांचे एक सेमिस्टर या पध्दतीने दोन वर्षात हा पूर्ण अभ्यास विद्यार्थ्यांना शिकता येईल. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम फक्त ४० टक्के महाविद्यालयात व उर्वरित ६० टक्के ऑनलाईन, प्रॅक्टीकल स्वरुपात शिकावा लागणार आहे. हा अभ्यासक्रम शिकून पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्याच्या गरजेनुसार हमखास जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळू शकतील.
यामध्ये पदवीबरोबरच पदव्युत्तर पदविकेचाही तीन महिन्यांचा अभ्यास राहणार आहे. डिझाईन टेक या कंपनीच्या मदतीने याचा कृत्रिम बुध्दिमत्तेचा अभ्यासक्रम आखण्यात आला असून आयबीएम व विद्या प्रतिष्ठानमध्ये यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार बारामतीत हा अभ्यासक्रम आखला असून याकरीता विद्या प्रतिष्ठानच्या प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.