सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : सर्वोच्च न्यायालयाने नव्याने लागू केलेल्या ‘ई-फायलिंग ‘ या नवीन नियमावली विरोधात इंदापूर वकील संघटनेच्या वतीने इंदापूर न्यायालय येथे काल गुरुवारी (दि.१९) एक दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले.
ई- फायलिंग मुळे न्यायालयात नवीन दाखल होणाऱ्या केसेसचे स्वरूप पूर्णतः बदलणार आहे. व न्यायालयीन कामकाजाची कागदपत्रे व नवीन दावे व केसेस ऑनलाईन पद्धतीने दाखल होणार आहेत. त्यामुळे त्याचा वाढणारा आर्थिक भार हा थेट पक्षकार यांच्यावरती पडणार आहे.
तसेच ई-फायलिंग संदर्भात ज्या पायाभूत सुविधा न्यायालय प्रशासनाने वकील व पक्षकार यांच्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अद्याप महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचलेल्या नाहीत. तसेच संगणक प्रिंटर, स्कॅनर, पुरेशी इंटरनेट सेवा ब्रॉडबँड या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रत्येक वाडी-वस्ती वरती राहणारे पक्षकार वकील यांच्याकडे फारशा उपलब्ध नसल्याने त्याचा थेट परिणाम न्यायालयाच्या कामकाजावरती व न्यायदान होणार आहे.
आपल्या देशांमध्ये सलग चोवीस तास वीज पुरवठा होत नाही अशा ग्रामीण भागामध्ये संपूर्ण न्यायव्यवस्था संगणकीकृत केल्यानंतर त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या याबाबत कोणतेही खुलासा प्रशासनाने अद्याप केलेला नाही. या सर्वांचा विचार करता हा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा व जोपर्यंत सर्व पायाभूत सुविधा पोहोचत नाहीत, तोपर्यंत असा कुठलाही प्रणालीचा अवलंब करू नये अशी मागणी यावेळी इंदापूर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनात इंदापूर वकील संघटनेचे सचिव ॲड. आशुतोष भोसले, उपाध्यक्ष ॲड. जमीर मुलाणी, ॲड. सुभाष भोंग, ॲड. अशोक कोठारी, ॲड. एल. पी. शिंगाडे, ॲड. शशिकांत साबळे, ॲड. प्रमोद खरात, ॲड. तेजसिंह पाटील, ॲड. नारायण ढावरे, ॲड. बापूसाहेब साबळे ॲड. जे. एन.पोळ, ॲड. श्रीकांत करे, ॲड. रोहित लोणकर, ॲड. आसिफ बागवान, ॲड. अवधूत डोंगरे, ॲड. रणजीत चौधरी, ॲड. आनंद केकान, दशरथ मगर, ॲड.आदित्य थोरात,ॲड. विनोद पारेकर, ॲड. राजेंद्र सोमवंशी,ॲड. अंजली दास, ॲड. किरण मेहता, ॲड. मनीषा आदलिंग, ॲड. सुचित्रा देवकाते आदी सहभागी होते.