सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – निमसाखर (ता.इंदापूर) येथे बी.के.बी.एन या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील चौकातील कोल्ड्रिंक्स दुकानाचा आश्रय घेवून देशी विदेशी दारू विक्री निर्धास्तपणे केली जात होती. मात्र वालचंदनगर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत दारू विक्रेत्यावर छापा टाकला. त्याच्याकडून 7110 रुपये किंमतीच्या 60 देशी, विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी किरण सुधीर भोसले (वय 29 रा. निमसाखर ता. इंदापुर, जि.पुणे) याच्यावर वालचंदनगर पोलिसांनी कारवाई केली असून पोलीस अंमलदार अभिजीत सूर्यकांत कळसकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (दि.19) वालचंदनगर पोलीस स्टेशन च्या पथकाने निमसाखर चौकामध्ये बीकेबीएन रोड लगत असलेल्या कोल्ड्रिंक्स दुकानाच्या आश्रयाने चालू असलेल्या देशी देशी दारूच्या विक्री अड्ड्यावर सकाळी छापा टाकला.
या छाप्यात कोल्ड्रिंक्स दुकानाच्या आडोशाला 60 दारू बाटल्या आढळून आल्या असून त्याची किंमत सुमारे 7हजार 110 रुपये इतकी आहे. देशी विदेशी दारू विनापरवाना जवळ बाळगून स्वतःच्या फायद्याकरीता विकण्यासाठी ठेवलेले मिळून आल्याच्या संदर्भात वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारुबंदी अधिनयम कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली.
पुढील तपास वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस नाईक बनसोडे हे करीत आहेत.