सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : नातेवाईक, भावकीत वाद हे होतच असतात. भांडणाचे रूपांतर मारामारीतही होत असल्याचे आपण पाहतो. मात्र पूर्वी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग नातेवाईकांनी थेट मुक्या जनावरांवर काढला गेला. रागाचा बदला बिचा-या कुत्र्याच्या जीवावर बेतला. पाळलेल्या चक्क जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याला नातेवाईकांनीच भाकरीतून विष देऊन ठार मारल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात गुलाब मुबारक मुलाणी यांनी वनगळी, ता. इंदापूर येथील तिघांविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी तिघांवर भा.द.वि. १८६० कलम ४२९ नुसार तक्रार दाखल केली आहे.
८ जानेवारी रोजी घराच्या अंगणात मोकळा सोडलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याला मध्यरात्री भाकरीतून विषारी औषध खाऊ घातल्याचा आरोप फिर्यादी यांनी वरील तिघा जणांवर केला आहे. त्यादिवशी रात्री दोन वाजता कुत्रा जोरात ओरडत असल्याचे समजताच फिर्यादी घराबाहेर आले. त्यावेळी घराच्या पाठीमागील बाजूने आरोपींना आपण पळून जाताना पाहिल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे.
घटनेनंतर कुत्र्याला तपासणीसाठी आलेल्या जनावरांच्या खाजगी डॉक्टरांनी कुत्र्याला विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यापूर्वी झालेल्या कौटुंबिक वादाच्या कारणावरून कुत्र्याला ठार मारल्याची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.