राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच तसेच संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमित सोनवणे, ऑल इंडिया दलित पँथरचे अध्यक्ष सागर उबाळे, विकी सरोदे, पप्पू बनसोडे,अजिंक्य गायकवाड, राजेश मंथने, त्यागी रणदिवे, प्रतीक पप्पू बनसोडे,अक्षय शिखरे, राहुल नायडू यांच्यासह इतर अनोळखी दहा ते पंधरा असे २६ जण तसेच संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे श्रीनाथ उर्फ बाळु ननवरे ( पुर्ण नाव माहित नाही ) व इतर अनोळखी १५ ते २० जणांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी ( दिनांक १७ ) श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दौंड शहरातील विठ्ठल मंदिरात धारकरी यांना मार्गदर्शन करणार होते. तसे नियोजन करण्यात आले होते मात्र संभाजी भिडे यांना येण्यास विविध आंबेडकरी संघटनांनी तीव्र विरोध केला होता. तसे पत्रही दौंड पोलीस स्टेशनला दिले होते. मात्र पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) चा आदेश ११ जानेवारी २०२३ रोजी जारी केला आहे त्यामुळे बेकादेशीर जमाव जमवता येणार नाही, आंदोलन करता येणार नसल्याचे या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र तरीही मंगळवारी ( दि.१७ ) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बेकायदेशीर जमाव जमवुन हातामध्ये काळे झेंडे घेऊन भिडे हमसे डरता है, पोलीस को आगे करता है अशी घोषणाबाजी करीत होते. संबंधित व्यक्तींनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २६ जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे, तसेच संभाजी भिडे यांच्या कार्यक्रम आयोजित करणारे धारकरी श्रीनाथ उर्फ बाळु ननवरे व इतर अनोळखी १५ ते २० अनोळखी व्यक्ती असे ४० ते ५० जणांवर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.