राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील पोलिस चौकीचे रुपांतर पोलिस ठाण्यात व्हावे यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घ्यावा अशा आशयाची बातमी महान्यूज लाईव्ह मध्ये आज सकाळी प्रसिध्द होताच दुपारी तीन वाजता थेट खासदार सुळे यांनी पाटस पोलिस चौकीला भेट दिली. येथील सर्व माहिती घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.
महान्यूज लाईव्ह मध्ये आज झालेल्या प्रकाशित बातमीनुसार खासदार सुळे यांच्यामुळे वरवंड येथे पोलिस चौकी नव्याने कार्यान्वित झाली. त्यामुळे आता पाटस पोलिस चौकीचे रुपांतर पोलिस ठाण्यात करावे, येथे पोलिसांची जादा कुमक असावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
त्याची दखल घेत आज इंदापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार सुळे यांनी सकाळीच पाटस येथे भेट देण्याचा निर्णय कळवला. त्यानुसार त्या दुपारी पाटस येथे आल्या व त्यांनी पाटस पोलिस चौकीची पाहणी केली.
हा विषय केंद्र सरकारकडे येत नसल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी महान्यूजचे दौंड विभागप्रमुख राजेंद्र झेंडे यांच्याकडे केली. त्यानंतर मात्र त्यांनी स्थानिक माहिती घेऊन या चौकीचे रुपांतर पाटस पोलिस ठाण्यात करण्यासाठी आपण संबंधितांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पोलिस निरीक्षक नाराय़ण पवार, रामभाऊ टुले, सरपंच अवंतिका शितोळे, शीतल चव्हाण, शिवाजी ढमाले, अजित शितोळे, विकास खळदकर, राहूल ढमाले आदी यावेळी उपस्थित होते.