कनेक्शन अडवल्याने महावितरणचा ५ लाखांचा महसूल बुडाल्याने महावितरणची कारवाई!
बारामती– विजेचा मागणीचा अर्ज असतानाही जाणीवपूर्वक तो अर्ज अडवून ठेवला म्हणून बारामती तालुक्यातील सुपे येथील महावितरणच्या अभियंत्यावर बारामतीच्या कार्यकारी अभियंत्याने निलंबनाची कारवाई केली आहे. विजजोड देण्यास हयगय केली व अर्जदाराचा अर्ज तसाच ठेवला, त्यामुळे महावितरणचा पाच लाख रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका ठेवून या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अर्ज केला तरी कनेक्शन मिळत नाही, भेटायला आले तर अभियंता गायब असतात अशा अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सुपे येथील वीज ग्राहकांकडून येत होत्या. त्याबाबत संबंधित अभियंता श्री. अभिषेक पुंडलिक मडावी यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस व आरोपपत्र देऊन ५१ हजारांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. मात्र तरीही कामात कसलीही सुधारणा झाली नसल्याने बारामती विभागीय कार्यालयाने श्री. मडावी यांचेवर बुधवारी (दि. १८) निलंबनाची कारवाई केली
सध्या महावितरण कंपनी शेतकरी मेळावे घेऊन शेतीपंपाला कनेक्शन देत आहे. मात्र सुपे येथील अभियंता मडावी यांनी जवळपास ६३ ग्राहकांचे अर्ज दाबून ठेवले. त्यांना कनेक्शन दिले नाही. त्यांच्यामुळे कंपनीचा सुमारे ५ लाख १३ हजारांचा महसूल बुडाला. त्यांच्या कामाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक तक्रारी येत होत्या.
जेव्हा वरिष्ठांनी ११ जानेवारी २०२३ रोजी सुपा येथे ग्राहक मेळावा घेतला. तेव्हा अनेक ग्राहकांनी महावितरणकडे मडावी यांच्या कामाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. या मेळाव्याला हजर राहण्याचे सौजन्य सुद्धा त्यांनी दाखविले नाही. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ते कोणत्याही रजेशिवाय गैरहजर आहेत. परिणामी वरिष्ठांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.